

Sambhajinagar Crime: 12 people arrested for drug trafficking
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर शहरात व परिसरात तरुण मुले, मुली विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अमली पदार्थांच्या आहारी ढकलणाऱ्या सक्रिय टोळीचा पर्दाफाश करत विशेष पथकाने मुख्य दोन तस्करांसह १२ जणांना ताब्यात घेतले असून, ४१ जणांविरूद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या टोळीकडून नशेचे सिरप, गोळ्या तसेच वाहन असे सुमारे १२ लाख ४८ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सदर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली.
शहरात व परिसरात नशेचे साहित्य पुरवणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी अनेक दिवसांपासून पाळत ठेवून होते. वाळूज परिसरातील व्हीआरएल लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमांतून नशेचा व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून यासाठी स्वतंत्र स्थापन केलेल्या पथकांनी शुक्रवारी (दि.१२) रात्री छापा मारून अविनाश पाटील (३४ रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव), अरशद पठाण (२६ रा. बायजीपुरा), समीर शेख (२३ रा. मोतीकारंज्या), अब्दुल अजीम कादर शहा (३० रा. मिसारवाडी), मोसीन अमिन तांबोळी (२५ रा. बायजीपूरा), सय्यद समीर सय्यद शौकत (२७ रा. बायजीपुरा), सोहेल हानिफ शाह (२४ रा. बायजीपुरा), सोहेल सलीमम ईलाबी (२० रा. नवाबपुरा), रिजवान खान रशिद खान (२५ रा. लक्कड मंडी रेंगटीपुरा), सय्यद अल्ताफ जफर (२२ रा. बायजीपुरा), रुपेश रामकृष्ण पाटील (रा. नाशिक), अमोल दत्तात्रय येवले (रा. नाशिक) आदी १२ जणांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ हजार ५०४ कोरेक्स सिरपच्या बाटल्या, कार, रिक्षा, मोबाईल आणि बनावट कागदपत्रे असा सुमारे १२ लाख ४८ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी पवार, पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सपोनि रविकांत गच्चे, अमोल म्हस्के, शिवाजी चौरे, अर्जुन कदम, संदीप काळे, चिखलीकर, अरुण भिसे, दिनकर आवारे, प्रतीक सावळे, अक्षय नाटकर, रोहित जाधव, सागर साळवे, महेश भालेराव, सागर शेंडे, शाहरुख शेख, निहाल सोनटक्के, अभिषेक बाढे, जुनैद शेख, पूजा भोसले, मनीषा नरोडे, पूजा इंगळे, माया माळी, वनिता तुपे आदींच्या पथकांनी केली.
२०२५ मध्ये शहर पोलिस, विविध पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा व अमलीपदार्थ प्रतिबंधक पथक यांच्याकडून २५१ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ३६५ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून सुमारे १ कोटी ९१ लाख ३० हजार १३६ रुपये किमतीचे अमलीपदार्थ यात गांजा, चरस, नशेकरिता वापरले जाणारे औषधी गोळ्या व सिरप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उप-आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके करत आहेत.
नशेचा व्यापाराचे पाळेमुळे खोदण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. नशेचे साहित्य शहरात विविध ठिकाणी पोहचवण्याचे काम करणाऱ्या सुमारे ४१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अनेक रिक्षाचालक, व डिस्ट्रब्युटर्सचा समावेश आहे. ही टोळी विविध औषधी दुकाने, डिस्ट्रीबूटर्स, डॉक्टर्स व ट्रान्सपोर्टस यांचेकडील साधनांचा व कागदपत्रांधा वापर करून उत्तर प्रदेशांसह मध्यप्रदेशातून सिरप व नशेच्या गोळया मागवत असल्याचे तपासात समोर आले आहे.