Sambhajinagar News : एपीएल शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार अनुदान; ५.४० कोटींचा निधी प्राप्त File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : एपीएल शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार अनुदान; ५.४० कोटींचा निधी प्राप्त

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी बातमी असून, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेअंतर्गत जिल्ह्याला ५ कोटी ४० लाख ५८ हजार १२६ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Subsidy to be credited to APL farmers' accounts soon

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी बातमी असून, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेअंतर्गत जिल्ह्याला ५ कोटी ४० लाख ५८ हजार १२६ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मागील दोन वर्षांपासून रोख अनुदान प्रलंबित असलेल्या लाभार्थीना या निधीतून रक्कम वितरित केली जाणार असून, त्यासाठी सर्व तालुक्यांकडून पात्र शेतकरी कुटुंबांची अद्ययावत माहिती मागविण्यात आली आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये अनुदान जमा केले जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-२०१३ मध्ये समावेश नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांसाठी राज्यातील १४ जिल्ह्यांत अन्नधान्याऐवजी थेट रोख अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे. जानेवारी २०२३ पासून लाभार्थ्यांना दरमहा १५० रुपये देण्यात येत होते. एप्रिल २०२४ पासून या अनुदानात वाढ करून ते १७० रुपये प्रतिमहिना करण्यात आले.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ५१ हजार ४७९ शिधापत्रिका असून, २ लाख ९ हजार २१० लाभार्थी नोंदणीकृत आहेत. आतापर्यंत सुमारे ४६ हजार ७३६ शेतकरी कुटुंबांनी अर्ज सादर केले आहेत. यात जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ३४.१९ कोटी रुपये, तर एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १६.२३ कोटी रुपये असे मिळून ५०.४३ कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले.

मात्र जानेवारी २०२५ पासून निधी उपलब्ध न झाल्याने अनुदान वितरणाला विलंब झाला. तसेच राज्य शासनाकडे जवळपास ४० कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित होते. त्याच्या पाठपुराव्यानंतर प्रथम ३.८४ कोटी, त्यानंतर मार्च २०२६ मध्ये ११.९१ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी सुमारे ११ कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थीना वितरित करण्यात आले. आता ६ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या ५.४० कोटी रुपयांच्या निधीतून उर्वरित थकीत लाभार्थीना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अशी आहे आकडेवारी

प्राप्त निधी ५.४० कोटी

जिल्ह्यातील शिधापत्रिका : ५१,४७९

नोंदणीकृत लाभार्थी : २,०९,२१०

अर्ज केलेली शेतकरी कुटुंबे : ४६,७३६

आतापर्यंत वितरित अनुदान : ५०.४३ कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT