अर्थवार्ता : 'मेड इन इंडिया'चा अमेरिकेत डंका! इंजिनीअरिंग, औद्योगिक उत्पादनांसाठी सुवर्णसंधी

अर्थवार्ता : 'मेड इन इंडिया'चा अमेरिकेत डंका! इंजिनीअरिंग, औद्योगिक उत्पादनांसाठी सुवर्णसंधी
अर्थवार्ता : 'मेड इन इंडिया'चा अमेरिकेत डंका! इंजिनीअरिंग, औद्योगिक उत्पादनांसाठी सुवर्णसंधी
Published on
Updated on

* गत सप्ताहात शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 316.57 अंकांची वाढ नोंदवली गेली असून निर्देशांक 82,814.71 पातळीवर बंद झाला. या सत्रात सेन्सेक्समध्ये 0.38 टक्क्यांची वाढ झाली. तसेच निफ्टीमध्ये 116.90 अंकांची वाढ नोंदवली गेली असून निर्देशांक 25,571.25 पातळीवर बंद झाला. या सत्रात निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ झाली.

* अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात लावलेले व्यापक आयात शुल्क 6 विरुद्ध 3 बहुमताने अवैध ठरवले असून 10 ते 50 टक्क्यांपर्यंतचे आयात शुल्क दर रद्द झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून अनेक देशांवर अतिरिक्त शुल्क लावले होते, भारताने त्या काळात आक्रमक प्रतिक्रिया न देता संयमाची भूमिका घेतली होती. आज न्यायालयाच्या निर्णयामुळे भारताची ती शांत आणि मुत्सद्देगिरीची भूमिका योग्य ठरली आहे. शुल्क रद्द झाल्यामुळे भारतीय पोलाद, अ‍ॅल्युमिनियम, औद्योगिक उत्पादने आणि काही अभियांत्रिकी वस्तूंना अमेरिकन बाजारात अधिक संधी मिळू शकते. व्यापार युद्धात न अडकता दीर्घकालीन हित जपण्याची भारताची रणनीती या घडामोडीतून स्पष्टपणे फायद्याची ठरल्याचे दिसून येत आहे.

* नोव्हार्टिसने या आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनीने भारतातील आपला व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 1,446 कोटींना विक्री होणार आहे. या निर्णयानंतर कंपनीच्या समभागांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली. नोव्हर्टिस इंडिया या भारतातील स्थानिक कंपनीमधील संपूर्ण 70.68 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय नोव्हर्टिस कंपनीने घेतला आहे. देशांतर्गत औषध कंपन्यांसाठी मात्र ही परिस्थिती संधीची ठरू शकते.

* उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत डिसेंबरअखेर 28,728 कोटी रुपयांचे वितरण झाले आहे. या योजनेमुळे 2.16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रांमध्ये 14.3 लाख प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाल्याचे सरकारने सांगितले. देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी या योजनेचा खर्च 15,541 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. उत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यास ही योजना मदत करत आहे.

* नवी मुंबई विमानतळावर फेडएक्सकडून एअर कार्गो केंद्र उभारण्यासाठी 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हे केंद्र पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे लॉजिस्टिक केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे आशिया, युरोप आणि अमेरिकेशी भारताचा व्यापारी संपर्क अधिक मजबूत होईल. प्रगत सॉर्टिंग आणि स्क्रीनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुमारे 6,000 थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. भारताच्या निर्यातक्षमतेला यामुळे मोठा आधार मिळणार आहे.

* मागील एका वर्षात म्युच्युअल फंड उद्योगात सुमारे 68 लाख नवीन गुंतवणूकदार जोडले गेले आहेत. त्यामुळे एकूण एकल र्(ीपर्र्ळिींश) गुंतवणूकदारांची संख्या 6 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. मात्र पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या एसआयपी खात्यांची संख्या घटली आहे. थेट माध्यमातून सुरू झालेल्या एसआयपी बंद पडल्याचा यावर परिणाम दिसतो. तरीही एकूण एसआयपी खात्यांची संख्या वाढलेली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

* एसबीआय म्युच्युअल फंड मार्च महिन्यात सुमारे 1.5 अब्ज डॉलरचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. हा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा सार्वजनिक इश्यू ठरू शकतो. बाजारातील स्थिती आणि मूल्यांकन लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मागील दोन वर्षांत आयपीओ बाजार मंदावलेला असताना हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. आयपीओमुळे भांडवली बाजाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

* इन्फोसिस आणि अँथ्रोपिक यांनी उद्योगांसाठी अनुकूल कृत्रिम बुद्धिमत्ता एजंटस् विकसित करण्यासाठी सहकार्याची घोषणा दिल्ली येथे भरलेल्या एआय परिषदेत केली आहे. या भागीदारीतून बँकिंग, वित्तीय सेवा, दूरसंचार आणि सॉफ्टवेअर क्षेत्रासाठी एआय उपाय विकसित केले जाणार आहेत. भारतात पुढील काही वर्षांत डेटा सेंटर्समध्ये सुमारे 200 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. एंटरप्राइज ऑपरेटिंग मॉडेल्स अधिक कार्यक्षम बनवण्याच्या द़ृष्टीने ही भागीदारी महत्त्वाची मानली जात आहे.

* जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर 1.81 टक्क्यांवर पोहोचून दहा महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. बिस्किटे, इतर प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, वस्त्रोद्योग आणि निर्मित वस्तूंच्या किमती वाढल्याने हा दर चढला. इंधन आणि वीज क्षेत्रातील महागाईही काही प्रमाणात वाढलेली आहे. अन्नधान्य गटात काही प्रमाणात दिलासा दिसत असला तरी भाजीपाला महागाई कायम आहे. घाऊक महागाई वाढली असली तरी तिचा थेट परिणाम पतधोरणावर होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

* जानेवारी महिन्यात सोन्याच्या आयातीत वाढ झाल्याने भारताची व्यापार तूट 34.68 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. निर्यात वाढ मर्यादित राहिली असताना आयात मात्र वेगाने वाढली आहे. अमेरिकेला होणारी निर्यात उच्च शुल्कांमुळे दबावाखाली असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीत एकूण व्यापार वाढ सकारात्मक राहिली आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे पुढील काही महिन्यांत व्यापार आकडे अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

* 13 फेब्रुवारी 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय चलन गंगाजळी 8.66 अब्ज डॉलरने वाढून विक्रमी 725.727 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील आठवड्यात ही गंगाजळी 717.067 अब्ज डॉलर इतकी होती. या वाढीत परकीय चलन मालमत्तांमध्ये 3.55 अब्ज डॉलरची, तर सोन्याच्या साठ्यात 4.99 अब्ज डॉलरची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष आहरण हक्कांमध्येही 103 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news