छत्रपती संभाजीनगर : कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाला छत्रपती संभाजीनगरचे ३ वाघ देऊन तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची जोडी सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात येणार आहे. या देवाण-घेवाणच्या प्रक्रियेसाठी नुकतेच शिवमोग्गाचे अधिकारी सिद्धार्थ उद्यानात येऊन गेले. १८ ऑगस्टला महापालिकेचे अधिकारी कर्नाटकला जाणार होते. मात्र हा दौरा आता आठवडाभर लांबणीवर पडला आहे.
कर्नाटक येथील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाकडून वाघांच्या जोडीचा शोध सुरू होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकच्या सिद्धार्थ उद्यानच्या प्राणिसंग्रहालयात बेंगॉल टायगरसह व्हाईट टायगर उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यावरून शिवमोग्गाच्या वतीने महापालिकेकडे संपर्क साधण्यात आला.
तेव्हा महापालिकेने शिवमोग्गाकडे सिंहासह अस्वल, कोल्ह्यांच्या जोडीची मागणी केली. याबाबत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी आपापल्या मागण्या नोंदविल्या. त्यावर केंद्रीय प्राण्यांची देवाण-घेवाण करण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून या मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील एक वाघ आणि दोन वाघिणी शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येणार असून, तेथील प्राणिसंग्रहालयातील सिंह, अस्वल, कोल्ह्याची जोडी मनपाच्या प्राणिसंग्रहालयात आणली जाणार आहे. शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाचे दोन अधिकारी नुकतेच सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वाघाची पाहणी करून गेले. त्यानंतर महापालिकेचे पथक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपायुक्त अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी शेख शाहेद, संजय नंदन यांच्यासह कर्मचारी सोमवारी कर्नाटकला जाणार होते. मात्र, अचानक हा दौरा रद्द झाला असून आता पुढील आठवड्यात २४ किंवा २५ ऑगस्ट रोजी हे अधिकारी रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे ऑगस्ट अखेर सिद्धार्थ उद्यानात दाखल होणारी सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी आता सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे.