

Siddharth Udyan 3 tigers Sambhajinagar go Karnataka zoo
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील तीन वाघ कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयास देण्यात येणार आहे. त्याबदल्यात सिद्धार्थ उद्यानमध्ये तब्बल २० वर्षांनंतर सिंहाची जोडीसह अस्वल, कोल्ह्यांची जोडी मिळणार आहे. याच प्रक्रियेसाठी सोमवारी कर्नाकटच्या उद्यानातून पथक शहरात दाखल झाले. वाघ पाहताच त्यांनी शेर बहुत हट्टेकट्टे आहेत, असे उद्गार काढले. १५ ऑगस्टनंतर दोन्ही उद्यानात हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात असलेल्या प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्याची जागा वाघांसाठी अपुरी आहे, असे म्हणत दहा वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिरकरणाने उद्यानातील प्राण्यांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून महापालिकेने मिटमिटा भागात दीडशे एकरमध्ये झुलॉजिकल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला.
स्मार्ट सिटी योजनेतून या पार्कसाठी निधी मंजूर झाला. त्यातून हे पार्क उभारण्यात येत असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महापालिकेला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राण्यांची संख्या वाढविण्यास मंजूरी दिली आहे. सिद्धार्थ उद्यानात २० वर्षांपासून सिंहाची जोडीच नव्हती. सुदैवाने शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाकडून सिद्धार्थ उद्यानाकडे वाघाची मागणी झाली. त्यावर उद्यानाने सिंहासह अस्वल, कोल्ह्याच्या जोडीची मागणी केली.
दरम्यान, या दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी सहमती दर्शविल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्यास मंजुरी दिली. त्यामुळे सोमवारी शिवमोग्गाचे पथक शहरात आले होते. त्यांनी उद्यानात येऊन वाघांची पाहणी केली. सध्या उद्यानात ७ पिवळ्या पट्ट्याचे वाघ आणि ५ पांढरे वाघ आहेत. वाघांची संख्या अतिरिक्त असल्याने तीन वाघ देऊन त्याबदल्यात सिंह घेण्यात येणार आहे. सोमवारी कर्नाटकच्या प्राणिसंग्रहालयाचे डायरेक्टर व्ही. एम. अमराकशर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुरली मनोहर यांनी सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांची पाहणी केली. यावेळी उपायुक्त अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहेद, संजय नंदन यांची उपस्थिती होती. पथकाने वाघांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे. त्यात पथकाला वाघ पाहताक्षणी आवडले.
गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगर हे वाघ पुरवठादार शहर बनले आहे. आतापर्यंत येथून देशातील विविध शहरांच्या प्राणिसंग्रहालयांना सुमारे ३० वाघ देण्यात आले आहेत. यात अहमदाबाद, पुणे, चंदीगड शहरांचा समावेश आहे. वाघांच्या जन्मदरासाठी संभाजीनगर प्राणिसंग्रहालय वातावरण लाभदायक ठरत आहे. आता कर्नाटकमध्ये श्रावणी, रोहणी आणि विक्रम नामक वाघ जाणार आहे.
शिवमोग्गा प्राणिसंग्रहालायाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर आता महापालिकेचे पथक कर्नाटकात जाणार आहे. १५ ऑगस्टनंतर तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्याच्या जोडीची पाहणी केल्यानंतर या प्राण्यांची देवाणघेवाण केव्हा होईल, हे निश्चित होणार आहे.