Sambhajinagar News: Passengers boarded from Ajanta, but were issued tickets for Jalgaon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : परराज्यातील तीन महिला व एक प्रवासी असे चार जण शुक्रवारी (दि.१८) दुपारी छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी वैजापूर डेपोच्या बसमध्ये बसले. वाहकाने त्यांना जळगाववरून बसल्यााचे तिकीट देत सुमारे २५० रुपये जास्त घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी छत्रपती संभाजीनगर मुख्य बसस्थानकावर तक्रार केली असून, ही तक्रार पुढील कारवाईसाठी वैजापूर आगाराकडे देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोलकत्ता येथील तीन महिला व एक पुरुष प्रवासी अजिंठा येथे पर्यटनासाठी आले होते. ते शुक्रवारी दुपारी पर्यटन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी बसमध्ये बसले. त्यांना नियमांनुसार तिकीटे देण्यात आली.
दरम्यान तिकीटासाठी छत्रपती संभाजीनगहून अजिंठ्याला जातांना तिकीटांसाठी दिलेले पैसे आणि अजिंठ्याहून संभाजीनगरकडे येताना तिकिटांसाठी लागलेले पैसे यात तफावत आढळल्याने प्रवाशांने या बाबत वाहकांकडे चौकशी केली. त्यावेळी २५० रुपये जास्त आले असून ते संभाजीनगरच्या मुख्य बसस्थानकांतून परत मिळतील असे सांगितले.
बस मुख्य बसस्थानकात आल्यानंतर संबंधित वाहकांने त्या प्रवाशांना चौकशी विभागाच्या वर असलेल्या कॅशियरच्या रुमकडे नेले. तेथे अधिकारी बाहेर गेले आहेत. ते आले की पैसे परत मिळतील असे सांगत त्यांना तेथेच उभे राहण्यास सांगितले व वाहक तेथून निघून गेला. दरम्यान काही वेळानंतर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे या प्रवाशांनी पैसे परतची मागणी केली.
त्यावेळी अशा प्रकारे येथून पैसे परत मिळत नसल्याचे सांगितले. वाहकाचा प्रताप ऐकून अधिकारही अवाक झाले. दरम्यान वाहकाने आपली फसवणूक केल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रार पुस्तकात तक्रार केली. या तक्रारीनुसार पुढील कारवाई वैजापूर आगार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.