

DPR work for Shendra to Waluj continuous flyover enters final stage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराची लाइफलाईन असलेल्या जालना रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आखण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी शेंद्रा ते वाळूज या अखंड उड्डाणपुलाच्या प्रकल्पाला आता मोठा वेग आला आहे. शेंद्रा ते पंढरपूरमधील तिरंगा चौकाच्या पुढे जाणाऱ्या या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्यात असून, येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
उद्योगनगरीतील वाढत्या गुंतवणूकीमुळे शेंद्रा ते वाळूज या दोन अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा कनेक्टिव्हीटीचा अखंड पूल असावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानूसार शासनाकडून या पूलाची घोषणा करण्यात आली होती. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली.
यावर पालकमंत्री शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शेंद्रा ते वाळूज या पूलाची घोषणा केली. त्याचा डीपीआर बनण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या वेळी सभागृहात पुलाचे नियोजन ठरले होते. हा रस्ता शेंद्रापासून ते पंढरपूरातील तिरंगा चौकापुढे निघेल. या कामांवर सुमारे ४ हजार रुपये कोटीचा खर्च होईल. डीपीआरवर शेवटच्या टप्यात आहे. ३ महिन्यात टेंडर प्रक्रिया होईल. असेही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. मराठवाड्यातील सर्वात लांबीचा म्हणजे सुमारे १८ किलोमीटर लांब हा उड्डाणपूल असणार आहे.
दोन ते तीन टप्प्यांत अखंड पूल
यासाठी जालनारोडवरील सध्याचे सिडको, सेव्हनहिल, मोंढा नाका हे जुने पूल पाडून त्यांच्या जागी एकच सलग आणि अखंड उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा संपूर्ण रस्ता दोन ते तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यामुळे प्रवासातील अडथळे दूर होऊन उद्योगांना आणि नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर गती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. शहरातील वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या आणि त्यामुळे मुख्य रस्त्यांवर होणारी कोंडी लक्षात घेता हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरच्या वाहतूक
व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरेल. या प्रकल्पामुळे शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बजाजनगर असा प्रवास अत्यंत गतिमान होणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्येः
प्रस्तावित खर्च : सुमारे ४,००० कोटी रुपये
व्याप्ती : शेंद्रा ते पंढरपूर (तिरंगा चौकापुढे)
स्वरूप : जुने पूल पाडून एकच सलग व अखंड
उड्डाणपूल
नियोजन : २ ते ३ टप्प्यांत काम पूर्ण करणार सद्यस्थिती : डीपीआर अंतिम टप्प्यात, पुढील महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होईल