Encroachment Removal : देवळाईतील २२ मालमत्तांवर दुसऱ्या दिवशी महापालिकेचा हतोडा file photo
छत्रपती संभाजीनगर

Encroachment Removal : देवळाईतील २२ मालमत्तांवर दुसऱ्या दिवशी महापालिकेचा हतोडा

दोन-तीन मजली इमारतींचे बाधित भाग जमीनदोस्त : आज आणखी पाच-सहा बांधकामांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News : Municipal hammer on 22 properties in Deolai on the second day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देवळाई चौकातून धुळे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या २४ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.१२) कारवाईचा धडाका कायम ठेवला. अतिक्रमण हटाव विभागाने तब्बल २२ मालमत्तांवरील रस्त्याच्या हद्दीत येणारे बांधकाम हटविले. यात दोन तीन मजली इमारतींचाही समावेश आहे. एका इमारतीचा बाधित भाग पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला, तर दुसऱ्या इमारतीचा रस्त्याच्या हद्दीत येणारा भाग जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने हटविण्यात आला. काही मालमत्ताधारकांनी कारवाई टाळून स्वतःहून बाधित बांधकामे काढून घेत महापालिकेला सहकार्य केले. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा मार्ग आणखी मोकळा झाला आहे.

देवळाई चौकातून पुढे धुळे सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या २४ मीटर रुंदीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. मात्र, देवळाई गावातील अनेक मालमत्ता प्रस्तावित रस्त्याच्या हद्दीत येत असल्याने कामाला अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मंगळवारपासून कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी १२ मालमत्तांवरील अडथळे दूर केल्यानंतर बुधवारी आणखी २२ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दोन तीन मजली इमारती प्रमुख अडथळा ठरत होत्या. त्यापैकी एका इमारतीचा रस्त्याच्या हद्दीत येणारा भाग पूर्णपणे पाडण्यात आला. दुसऱ्या इमारतीचा बाधित भाग जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने हटविण्यात आला. काही मालमत्ताधारकांनी स्वतःहून बांधकामे काढून घेतल्याने महापालिकेच्या पथकाला सहकार्य मिळाले. ही कारवाई अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पथकात प्रभाग आठचे सहायक आयुक्त भारत बिरारे, कदम, इमारत निरीक्षक कुणाल भोसले तसेच नागरिक मित्र पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या मार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या आणखी पाच ते सहा बांधकामांवर गुरुवारी (दि. १३) कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

धार्मिक स्थळांचा बाधित भागही हटणार

रस्त्याच्या पुढील टप्प्यात दोन धार्मिक स्थळांचे काही भाग रस्ते रुंदीकरणात बाधित होत आहेत. संबंधित नागरिकांनी रस्त्याच्या हद्दीत येणारे बांधकाम स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या ठिकाणीही कारवाईला सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आणखी पाच ते सहा बांधकामांवर गुरुवारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त संजय सुरडकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT