Sambhajinagar News: Monsoon is approaching, but the city's drains are still clogged with garbage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महापालिकेची नाले सफाई मोहीम केवळ कागदावरच असल्याचे विदारक चित्र शहरात पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून नाले सफाईचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील बहुतांश लहान-मोठे नाले कचरा आणि गाळाने तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील सखल भागांत पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
मान्सूनपूर्व नाले सफाईसाठी यंदा महापालिकेने सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन केले होते. नाले सफाई वेळेत पूर्ण करण्यासाठी पोकलेन, जेसीबी आणि इतर वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र जूनचा पहिला आठवडा उलटूनही अनेक भागांतील कामे अर्धवट आहेत. सिटी चौक, बारूदगर नाला आणि संभाजीपेठ भाजी मंडई परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे.
गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता
औषधी भवन परिसरातील नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा तसाच काठावर सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात हा गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने सफाईवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. याशिवाय किराडपुरा, नेहरूनगर, कबाडीपुरा आणि रोहिला गल्ली परिसरातील नाले अद्यापही सफाईच्या प्रतीक्षेत आहेत.
काही नाल्यांमध्ये पाण्यापेक्षा प्लास्टिक आणि कचराच अधिक दिसत आहे. या ढिसाळ नियोजनामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षितते-पेक्षा कंत्राटे आणि कागदी अहवालांनाच महत्त्व दिले जात असून, मपाणी घरात शिरल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे.