Fraud Case : कोमात असलेल्या वकिलाची बनावट स्वाक्षरीने लाटली जमीन (File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : कोमात असलेल्या वकिलाची बनावट स्वाक्षरीने लाटली जमीन

३१ वर्षापूर्वीचे प्रकरण : पुंडलिकनगर पोलिसांत १० सेवानिवृत्तांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Land misappropriated using the forged signature of a lawyer in a coma

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गारखेडा परिसरातील मोक्याची जमीन हडप करण्यासाठी, शासकीय रुग्णालयात 'कोमात' असलेल्या एका वकिलाच्या नावे १९९५ साली चक्क बोगस खरेदीखत तयार करून जमीन हडपण्यात आली होती. हा प्रकार २०१७ साली उघडकीस आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीही केली होती.

मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी गुरुवारी (दि.२०) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात १० जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण न्यायव्यवस्थेशी संबंधित तर काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत.

किसन नागोराव पाटील (रा. निलंगा, जि. लातूर), दिलीप सीताराम जामखेडकर (रा. भुसावळ, जि. जळगाव), समिउल्लाह रहेमतुल्लाह युसुफ झई (रा. कामोठे, नवी मुंबई), अशोक सिद्रामप्पा येणेगुरे (रा. एन-३, छत्रपती संभाजीनगर), स्मिता विनय बोरीकर (रा. बालेवाडी, पुणे), शंकर तुळशीराम नाईक (रा. मरीन ड्राईव्ह, मुंबई), दिलीप साहदू भामरे (रा. विश्रांतवाडी, पुणे), कृष्णा रघुनाथराव इटोलीकर (रा. तपडिया नगर, छत्रपती संभाजीनगर), वासुदेव विठूजी गुधाणे (रा. ओंकार नगर, नागपूर) आणि अशोक पंढरीनाथ मत्ते (रा. जझरी रोड, नागपूर) अशी दहा आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी डॉ. आशा उत्तम बिनवडे (६०, रा. अशोक नगर, गारखेडा रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती स्व. अॅड. उत्तम भगवानराव बिनवडे यांची गारखेडा (गट क्र. ३६/२) येथे ०.४ हेक्टर जमीन होती. अॅड. बिनवडे यांना यकृताचा आजार असल्याने ते ८ सप्टेंबर १९९५ ते १० ऑक्टोबर १९९५ या काळात 'हिपॅटिक कोमा' अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल होते आणि १० ऑक्टोबरला तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

मात्र, अॅड. बिनवडे हे रुग्णालयात कोमात असतानाच १५ सप्टेंबर १९९५ रोजी आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांच्या नावे चक्क एक बनावट खरेदीखत नोंदणीकृत केले. या खरेदीखतावर अॅड. बिनवडे यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली असून, साक्षीदार म्हणून त्यांच्या पत्नीची (डॉ. आशा) देखील खोटी स्वाक्षरी करण्यात आली होती.

तर, दुसरा साक्षीदार म्हणून एस.आर.ओ. कार्यालयाबाहेर बसणाऱ्या एका स्टॅम्प व्हेंडरची सही घेण्यात आली. या स्टॅम्प व्हेंडरकडे चौकशी केली असता, मी अॅड. बिनवडे यांना ओळखतच नाही आणि मी अशी साक्ष दिल्याचे मला आठवतही नाही, असे त्याने स्पष्ट केले. ज्या बाँडवर हे बनावट खरेदीखत नोंदवले, तो बाँड अॅड. बिनवडे यांनी खरेदी केलेलाच नव्हता. तो प्रतिवादी क्र. ७ शंकर नाईक यांच्या नावे खरेदी करण्यात आला होता आणि कार्यालयाच्या 'डे-बुक'वर प्रतिवादी क्र. ३ समीउल्लाह झई यांची स्वाक्षरी होती.

पोलिसांनी 'दिवाणी वाद' म्हणून फाईल केली होती बंद

ऑक्टोबर २०१७ मध्ये अप्पर तहसीलदारांच्या नोटिशीनंतर डॉ. आशा यांना हा प्रकार समजला. त्यांनी ९ जानेवारी २०१८ रोजी पोलिस आयुक्तांकडे, त्यानंतर २७मार्च २०१९ रोजी आणि पुन्हा १७ मे २०२३ रोजी पोलिसांना सविस्तर तक्रार अर्ज दिले. मात्र, आरोपी हे सेवानिवृत्त अधिकारी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने १ सप्टेंबर २०२० रोजी पत्र पाठवून, दिवाणी न्यायालयात मनाई हुकूमाचा दावा प्रलंबित आहे, त्यामुळे हा दिवाणी वाद आहे, असे कारण देत कोणतीही चौकशी न करता फाईल बंद केली होती. अखेर फिर्यादी डॉ. आशा बिनवडे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त शिवप्रसाद कहऱ्हाळे करत आहेत.

बनावट विक्रीपूर्व करार अन बेकायदेशीर प्लॉटिंग

या भामट्या टोळीने केवळ खरेदीखतच बनवले नाही, तर नावांची केवळ आद्याक्षरे वापरून एक बनावट विक्रीपूर्व करार तयार केला आणि त्याआधारे सातबारा उताऱ्यावर 'फेरफार क्रमांक १०३०' करून मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे, या ११ पैकी ६ जणांनी १०० रुपयांच्या बाँडवर दोन एजंटांना 'मुख्त्यारनामा' लिहून दिला. या एजंटांनी जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर प्लॉटिंग केले आणि फिर्यादीला धमकावले. या एजंटांवर आधीच दोन एफआयआर व दोषारोपपत्र दाखल आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालयाचे संगनमत

एस.आर.ओ. अधिकाऱ्यांनी हे खरेदीखत 'प्रत्यक्ष हजर राहणाऱ्या व्यक्तींनी' नोंदवल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात अॅड. बिनवडे 'कोमात' होते. अधिकाऱ्यांनी ओळखपत्रे व मालमत्तेची कागदपत्रे जुळवून न पाहता ही नोंदणी केल्याने अधिकाऱ्यांचे यात थेट संगनमत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे

फेरफारच्या नोटिशीने फुटले बिंग

ऑक्टोबर २०१७ मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून जेव्हा डॉ. आशा यांना सातबारा उताऱ्यावर नाव बदलण्याबाबत (फेरफार) नोटीस आली, तेव्हा त्यांना या फसवणुकीचा उलगडा झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT