Sambhajinagar News: Finally, 209 Electric Poles to be Removed from 9 Roads
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी मोहीम राबवून रस्तेही तयार केले. मात्र, या कारवाईनंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब स्थलांतरित केले नाही. अखेर या कामासाठी महापालिकेने लिनर इलेक्ट्रिकल नावाची कंत्राटदार कंपनी नियुक्त केली असून ९ रस्त्यांवरी २०९ खांब स्थलांतर करण्यासाठी कंपनीला २७ कोटी रुपये दिले जाणार आहे. त्यामुळे या कामानंतर रस्त्यातील खाबांचे अडथळे दूर होणार आहे.
महापालिकेने शहर विकास आराखड्यानुसार विविध रस्त्यांवर धडक मोहीम राबवून बाधित मालमत्ता काढल्या. या पाडापाडीनंतर अनेक ठिकाणी पथदिवे, महाविरणाच्या वीज कनेक्शनचे खांब रस्त्याच्या मध्यभागी आले. हे खांब काढण्यासाठी महापालिकेने अनेकवेळा महावितरणाकडे खेट्या मारल्या, पैसेही भरणा केले. परंतु, खांब काढण्याकडे दुर्लक्षच झाले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काही मार्गावरील खांब काढण्यात आले.
अखेर पहिला अनुभव घेतल्यानंतर उर्वरित ९ मार्गावरील २०९ खांब काढण्यासाठी महापालिकेने महावितरणाऐवजी स्वतःच प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेनेच निविदा प्रक्रिया राबविली आहे. आता याकामासाठी महापालिकेने लिनर इलेक्ट्रिकल नावाची कंपनीला २७ कोटी खर्चाचे कंत्राट दिले आहे. कार्यारंभ आदेशही देण्यात आला असून लवकर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी दिली.
या रस्त्यांचा समावेश
हर्सल कारागृह ते हसूल तलाव, वसंतराव नाईक चौक परिसर, कटकट गेट ते रोशन गेट, रंगार-गल्ली ते गुलमंडी, रेल्वे गेट ते पैठण गेट, आर. के. वॉशिंग सेंटर ते सोलापूर हायवे, रेणुका माता कमान ते चाटे स्कूल, हायकोर्ट गेट ते हायकोर्ट सिग्नन, खडी रोड ते देवळाई परिसर.