Sambhajinagar News : Deadly attack on crime branch team by family of notorious criminal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकावर अर्जुन तांबे अंशुमन जैन दांडा आणि दगडांनी आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांनी टिकाव, जीवघेणा हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने एका पोलिस हवालदाराच्या डोक्यात थेट लोखंडी टिकाव मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या पत्नी, मुलगा आणि मुलीने इतर अंमलदारांना मारहाण करून महिला पोलिसाचा हात पिरगाळत धक्काबुक्की केली. या झटापटीत पोलिसांचे कपडे फाटले असून अनेक अंमलदार जखमी झाले आहेत. हा थरार मंगळवारी (दि. ३) रात्री पावणेनऊ ते सव्वानऊ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडीतील रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळील मुकुंदनगर भागात घडला.
अर्जुन उर्फ बंडू सखाराम तांबे (४०, रा. मुकुंदनगर), सुरेखा अर्जुन तांबे (पत्नी), सोपान अर्जुन तांबे (मुलगा) उमा अर्जुन तांबे (मुलगी, सर्व रा. मुकुंदनगर, रेल्वे गेट ५६ जवळ, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. तर न्यायालयाने चौघांची हर्सल कारागृहात रवानगी केल्याचे मुकुंदवाडीचे निरीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितले.
पुंडलिकनगर ठाण्यात दाखल फसवणूक व मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अर्जुन तांबे व त्याचे इतर साथीदार मुकुंदवाडी परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, उपनिरीक्षक अर्जुन कदम, प्रवीण पाथरकर, हवालदार श्रीकांत काळे, निकम, गुप्ता, गोरे, गिते, यदमळ, सपकाळ, महिला अंमलदार भोसले, जटाळे व शिकारे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी सापळा रचून या गुन्ह्यातील पहिला आरोपी अंशमन चांदमल जैन (२६. रा. अंबिकानगर याला मुकुंदवाडीतून ताब्यात घेतले. याच गुन्ह्यात त्याची आई आरती जैन (५२) सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने तिलाही पकडून दोघांना पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर हवालदार काळे आणि अंमलदार गिते यांना रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अर्जुन मुकुंदनगर येथील घरी आल्याची पक्की खबर मिळाली.
अर्जुन दिसताच त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तुमच्यात दम असेल तर हात लावून दाखवा असे म्हणत थेट हवालदार काळे यांच्यावर लोखंडी टिकाव घेऊन डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने मारला. मात्र काळे यांनी प्रसंगावधान राखन बाजला होत वार चकवला. त्याच वेळी अंमलदार गिते यांनी तांबेच्या हातातील टिकाव हिसकावून बाजूला फेकला.
तत्कालीन ठाणेदारालाच दिली खुनाची धमकी
तांबेने मुकुंदवाडी ठाण्याच्या तत्कालीन एका पोलिस निरीक्षकाला फोन करून अश्लील शिवीगाळ करत धमकावले होते. माझ्यावर गुन्हे दाखल का करतो असे म्हणत त्याने थेट घरी येऊन तुझा मर्डर करतो अशी भाषा वापरली होती. तो वारंवार पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर तपासाला वेग आला आणि तांबे गजाआड झाला-
संपूर्ण कुटुंब पोलिसांच्या अंगावर धावून आले
अर्जुन तांबे याला पकडताच त्याचा मुलगा सोपान हा घरातून दांडा घेऊन आला आणि त्याने गिते यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. त्याच वेळी तांबे याची पत्नी सुरेखा हिने दगड गिते यांच्या दिशेने भिरकावला. हवालदार काळे यांनी मोबाईलवरून पाठवलेल्या लोकेशननुसार तात्काळ उपनिरीक्षक कदम पथकासह पोहोचले. त्यावेळी तांबेची मुलगी उमा आणि पत्नी सुरेखा या दोघी पोलिसांशी हुज्जत घालत अटकेला विरोध करत होत्या. महिला अंमलदार जटाळे या दोघींना बाजूला करत असताना, उमा हिने जटाळे यांचा हात पिरगाळून धक्काबुक्की केली आणि नखांनी ओरबाडून ढकलून दिले. या हल्ल्यात हवालदार काळे व गिते यांचे कपडे फाटले तर यदमळ यांच्या मांडीवर दांडा लागल्याने ते जखमी झाले.
वरिष्ठ अधिकारी फौजफाटा घेऊन पोहोचले
आरोपींचे संपूर्ण कुटुंब पोलिसांवर तुटून पडल्याने उपनिरीक्षक कदम यांनी तातडीने गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कल्याणकर हे अतिरिक्त पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुकुंदवाडीचे निरीक्षक विवेक सोनवणे यांनीही पथकासह धाव घेतली. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून तांबे कुटुंबाला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे हवालदार श्रीकांत काळे यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाला.
तांबे सराईत 'हिस्ट्रीशीटर'; ८ गंभीर गुन्हे
तेलंगणा राज्यात त्याच्यावर तांब्याच्या तारा चोरल्याचे अनेक गुन्हे दाखल असून, तेलंगणा पोलिस त्याच्या शोधात अनेकदा मुकुंदवाडीत येऊन गेले आहेत. संभाजीनगरातही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. २०११ मध्ये चिकलठाणा ठाण्यात खून, २०१३ ला करमाडमध्ये प्राणघातक हल्ला, २०२१ मध्ये साताऱ्यात फसवणूक व बनावटगिरी तर मुकुंदवाडीत विनयभंग, मारहाण व अॅट्रॉसिटीचे तीन, असे सहा गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. आता पुंडलिनगरात फसवणुकीचा आणि मुकुंदवाडी जीवघेणा हल्ला केल्याचा नवीन गुन्हा यात वाढला आहे.