

The auspicious festival of Diwali begins with cow worship
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मांगल्य, समृद्धी आणि वात्सल्याचा संदेश देणाऱ्या वसुबारसने गुरुवारी (दि. ५) दिवाळीच्या आनंदपर्वाला मंगलमय सुरुवात झाली. शहरातील गोपालन केंद्रांसह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी गाय-वासरांचे पूजन करून सवत्स धेनूची आराधना करण्यात आली. हळद-कुंकू, फुलांच्या माळा, औक्षण आणि गोडधोडाच्या नैवेद्याने गोमातेचे पूजन करत दीपोत्सवाचे पारंपरिक उत्साहात स्वागत करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत गायीला मातेचे स्थान असून, गाय आणि वासराच्या नात्यातील माया, वात्सल्य आणि निरपेक्ष प्रेमाचा गौरव वसुबारसच्या निमित्ताने केला जातो. वर्षभर शेती, दुग्धव्यवसाय आणि मानवी जीवनाला आधार देणाऱ्या गोमातेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. यानिमित्ताने शहरातील पांजरपोळ आणि विविध गोपालन केंद्रांमध्ये गाय-वासरांना सजवून त्यांचे पूजन करण्यात आले. त्यांना फुलांच्या माळा घालून, हळद-कुंकू लावून औक्षण करण्यात आले. गोडधोडाचा नैवेद्य दाखवून गोमातेचे आशीर्वाद घेण्यात आले.
ग्रामीण भागातही वसुबारसचा उत्साह अनुभवायला मिळाला. शेतकरी कुटुंबांनी आपल्या गोठ्यातील गाय-वासरांचे पूजन केले. गायींची स्वच्छता करून त्यांना सजविण्यात आले. अंगणात रांगोळी काढून, दिवे लावून पारंपरिक पद्धतीने सवत्स धेनूची पूजा करण्यात आली. काही ठिकाणी कुटुंबातील महिलांनी उपवास करून सायंकाळी सूर्यास्तानंतर गोपूजन केले. 'दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी' या पारंपरिक लोकपरंपरेतून सणाचा आनंद अधिकच द्विगुणीत झाला.
वसुबारस हा केवळ धार्मिक विधी नसून, पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा सण आहे. गोमातेच्या पूजनातून कुटुंबाच्या सुख-समृद्धीची आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते. शहरी भागात प्रत्यक्ष गाय उपलब्ध नसल्यास काही कुटुंबांमध्ये गायी-वासराच्या प्रतिमेचे पूजन करून परंपरा जपण्यात आली.
घराघरांत लगबग वाढली
दरम्यान, वसुबारसने दिवाळीचा प्रारंभ झाल्याने घराघरांत उत्सवाची लगबग वाढली आहे. दारात तोरणे, अंगणात रांगोळ्या, घरांवर आकाश कंदील आणि पणत्यांची आरास करण्याची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठांमध्येही दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. फराळाच्या पदार्थांचा दरवळ आणि दिव्यांच्या प्रकाशाने पुढील काही दिवस अवघे वातावरण दीपोत्सवाच्या आनंदाने उजळून निघणार आहे.