

Den for alcohol consumption, spotted by the Commissioner, dismantled
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जॉगिंग करताना महापालिका आयुक्तांच्या नजरेस पडलेल्या नियमबाह्य मद्यपानाच्या अड्ड्यावर दुसऱ्याच दिवशी कारवाई करण्यात आली. गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात डिसुझा वाईन शॉपच्या चालकाने दुकानाच्या पायऱ्यांलगत अनधिकृत शेड उभारून ग्राहकांसाठी मद्यपानाची व्यवस्था केली होती. याची गंभीर दखल घेत आयुक्त अमोल येडगे यांनी शेड हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी (दि. ४) अतिक्रमण विभागाने शेड उद्ध्वस्त करून संबंधित दुकानचालकाला दंड ठोठावला.
महापालिका आयुक्त अमोल येडगे हे मंगळवारी (दि.३) सकाळी सूतगिरणी परिसरात जॉगिंगसाठी गेले होते. यावेळी त्यांना वाईन शॉपलगत सार्वजनिक जागेवर अनधिकृतपणे शेड उभारून मद्यपानासाठी ग्राहकांना जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आढळून आले. बांधकाम परवानगीतील निर्धारित वापर बदलून अशा प्रकारे जागेचा वापर करणे नियमबाह्य असल्याने त्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
त्यानुसार अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त (अतिक्रमण) संजय सुरडकर, बांधकाम निरीक्षक देसाई आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. हे अनधिकृत शेड हटविण्यात आले असून, दुकानचालकावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. महापालिका हद्दीत सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणे किंवा बांधकाम परवानगीतील वापरात बदल करून नियमबाह्य पद्धतीने जागेचा वापर करणे खपवून घेतले जाणार नाही.
संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आयुक्त येडगे यांनी दिला आहे. दरम्यान, महापालिकेने यापूर्वीच यासंदर्भात जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले असून, त्याला उच्च न्यायालयानेही योग्य ठरविले आहे. त्यामुळे प्रगटनातील सूचनांचे पालन करून अतिक्रमण विभागानेही शहरात प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त येडगे यांनी दिले आहेत.