Sambhajinagar News: Angry Citizens Stage 'Pothole Worship' Protest
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : न्यू हनुमानरगर भागात नवीन ड्रेनेज वाहिनी टाकल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे कंत्राटदारासह महापालिकेने दुर्लक्ष केले. सुमारे एक महिना उलटूनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याकडे तक्रार केली. परंतु त्यावरही काम न झाल्याने अखेर बुधवारी (दि.११) नागरिकांनी खड्डा पूजन आंदोलन केले.
प्रभाग क्रमांक २२ मधील न्यू हनुमाननगर गल्ली नं. २ येथे नवीन ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी संपूर्ण गल्लीतला रस्ता उखडण्यात आला. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून सतत दुर्लक्षच करण्यात आले. खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना याबाबत माहिती देण्यात आली. तातडीने काम करण्यात येईल, असे आश्वासन जागेची पाहणी करून दिले. मात्र त्या पाहणीनंतर तब्बल १२ दिवस उलटूनही प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी दुपारी अनोख्या पद्धतीने खड्डन पूजन आंदोलन केले.
यावेळी रस्त्यातील खड्याला हार घालून नारळ फोडले. तसेच महिलांनी खड्याची आरती करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सद्बुद्धी मिळावी यासाठी प्रतीकात्मक पूजन केले. यावेळी आंदोलन आयोजन करणारे विशाल पुंड यांच्यासह मीनाक्षी थोरात, शोभा दाभाडे, अंजना जाधव, जना गीते, अनिता बिरादार, राजकन्या थोरात, वैष्णवी जाधव, प्रमिला पुंड, अर्चना थोरात, छाया शिंदे, मंगल देशमुख, सुरेखा सूर्यवंशी, बापू कवळे, सतीश बेरड यांच्यासह वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात चर्चा रंगली असून, प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.