

Another 35 e-buses to join the ST fleet
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर: प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या ई-शिवाई बसची विविध मार्गांवर मोठी मागणी होत आहे. चार्जिंग सेंटरच्या अभावामुळे नवीन बसचे आगमन थांबले होते, मात्र आता रेल्वेस्टेशन आणि सिल्लोड येथील चार्जिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच ३५ नवीन ई-बस शहरात दाखल होणार असून, त्या शिर्डी, जळगाव आणि अहिल्यानगर मार्गावर चालवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात विविध मार्गांवर ७३ ई-बस धावत आहेत, तर मुख्य बसस्थानकावरून २६ बसची सेवा सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून जळगाव, शिर्डी आणि अहिल्यानगर मार्गावर ई-बस सुरू करण्याचे नियोजन होते, परंतु चार्जिंग सुविधेअभावी ते लांबणीवर पडले होते.
रेल्वेस्टेशन परिसरात एसटीच्या चार्जिंग सेंटरचे काम पूर्ण होताच मुख्य बसस्थानकाला २० नवीन बस मिळणार आहेत. यामुळे येथील ई-बसची एकूण संख्या ४६ वर पोहोचणार आहे.
सिल्लोड आगाराला १५ ई-बस
सिल्लोड आगारातही चार्जिंग सेंटरचे काम पूर्णत्वाकडे असून, ते कार्यान्वित होताच विविध मार्गावर ई-बसची सेवा सुरू केली जाईल. या आगारासाठी १५ बस मंजूर करण्यात आल्या आहेत. या बसमुळे सिल्लोड परिसरातील प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दररोज ७० बस होणार चार्ज
एसटी महामंडळाच्या रेल्वेस्टेशन परिसरातील जागेवर चार्जिंग सेंटर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. येथे १८ चार्जर पॉइंट्स उपलब्ध करून दिले आहेत. या ठिकाणी एका दिवसात सुमारे ७० ई-बस चार्ज करण्याची क्षमता असेल. त्यामुळे स्थानिक बससह बाहेरच्या आगारातून येणाऱ्या बसनाही येथे चार्जिंगची सुविधा मिळेल, असेही नेहूल यांनी स्पष्ट केले.