Sambhajinagar News : 20 gangmen on indefinite hunger strike in front of Divisional Commissionerate for PF
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अंबाजोगाई उपविभागातील २० गँगमन कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अद्यापही जमा न झाल्याने त्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ग्रामविकास विभागाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले असले, तरी पीएफचा प्रश्न वर्षभर उलटूनही निकाली न निघाल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते व पाटबंधारे कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवार (दि. १५) पासून विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. यात आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरापासून भविष्य निर्वाह निधी जमा न झाल्याने बीड जिल्हा परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार १५ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यापूर्वी अपर आयुक्तांच्या उपस्थितीत बैठकही घेण्यात आली, मात्र त्यातून कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी नियोजित आंदोलन सुरू केले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी जोरदार पावसातही उपोषणकर्त्यांनी आंदोलन कायम ठेवले आहे.
संघटनेचे सचिव राजेंद्र विहिरे यांनी सांगितले की, संबंधित २० कर्मचाऱ्यांपैकी काही जण सेवानिवृत्त झाले आहेत, तर काहींचे निधन झाले आहे. तरीही त्यांच्या खात्यात आजतागायत पीएफची रक्कम जमा झालेली नाही. तसेच सेवेत असताना त्यांच्या वेतनातून पीएफसाठी कपात करण्यात आली.
मात्र त्या कपातीच्या पावत्याही संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. जिल्हा परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि पीएफची थकीत रक्कम तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठीही प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे संघटनेने म्हटले आहे.
या बेमुदत उपोषणात संघटनेचे सचिव राजेंद्र विहिरे यांच्यासह अशोक कांबळे, रमेश उदार, विश्वनाथ बाबूराव, लहू मुंडे, दत्तू फड, चंद्रकांत जाधव, रमेश मिसाळ, पाटलोबा फड, दगडू कांबळे, दामू उदार आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.