

Parbhani Land Acquisition Compensation
पाथरी : तालुक्यातील रामपुरी येथील भूसंपादनात जमिनीला बागायती व हंगामी बागायती दर मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी 'महाराष्ट्र राज्य किसान सभे'च्या वतीने पाथरी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. १३ जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज (दि. १४) दुसरा दिवस असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
भूसंपादन अधिकाऱ्यांनी रामपुरी येथील जमिनीचा अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर केला आहे. मात्र, हा निवाडा जाहीर करताना प्रशासनाने अनेक त्रुटी ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे मांडण्यात आले आहेत
मागील तीन वर्षांतील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांमधील सर्वाधिक दराच्या (उच्च) नोंदी जाणीवपूर्वक वगळण्यात आल्या आहेत. जायकवाडी व ढालेगाव बंधाऱ्याचा लाभ: संबंधित शिवार हे जायकवाडी कमांड एरियात तसेच ढालेगाव बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्रात येते. या बंधाऱ्याचे सुमारे ११०० हेक्टर लाभ क्षेत्र असून, परिसरात विहिरी, बोअरवेल आणि मोटार पाईपलाईनची मोठी सोय आहे.
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर ऊस, कापूस, गहू, हरभरा यांसारख्या हंगामी व बारमाही बागायती पिकांच्या अधिकृत नोंदी आहेत. त्यामुळे या सर्व जमिनींना कोरडवाहू ऐवजी बागायती व हंगामी बागायतीचे योग्य दर द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे पदाधिकारी कॉ. मुजाभाऊ लिपने, कॉ. नवनाथ कोल्हे, अनिल फलके, अमोल मुळी, शाम काळे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. प्रशासनाने तत्काळ या प्रकरणात मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.