

Pending wages of contract employees finally credited
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून धरणाऱ्या खासगी एजन्सींना अखेर महापालिका आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतर झुकावे लागले आहे. कर्मचाऱ्यांनी थेट तक्रार केल्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित एजन्सींना नोटीस बजावण्याचे आदेश बुधवारी (दि.१७) दिले होते. या कारवाईच्या धास्तीने अवघ्या २४ तासांत, गुरुवारी उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा झाले.
महापालिकेच्या विविध विभागांत सुमारे दोन हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पुरवठ्यासाठी प्रशासनाने गॅलेक्सी, अशोका, ओम साई, सीआयएसबी, मेडिएटर्स आणि सिंग या एजन्सींशी करार केला आहे. करारातील अटींनुसार दरमहा वेळेत वेतन देणे बंधनकारक असतानाही काही एजन्सींनी यात टाळाटाळ केली होती. १० जून रोजी आयुक्तांनी बैठक घेऊन उपस्थिती अॅपमधील त्रुटी दूर करत वेळेत पगार देण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर अकुशल आणि अर्धकुशल कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले, मात्र कुशल श्रेणीतील कर्मचारी वंचित होते. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटला असला तरी, दुसरीकडे एजन्सींनी सादर केलेली दोन महिन्यांची बिले अद्याप महापालिकेच्या लेखा विभागाकडे प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केल्यानंतर आता आपली ही थकीत देयकेही प्रशासनाने तातडीने मंजूर करावीत, अशी मागणी संबंधित एजन्सींनी केली आहे.
थकीत देयके तात्काळ देण्याची मागणी
बुधवारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आयुक्तांची भेट घेतल्यानंतर कामगार विभागाला तातडीने नोटिसा काढण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासनाचा हा आक्रमक पवित्रा पाहून एजन्सींनी गुरुवारी दुपारपासूनच कर्मचाऱ्यांचे पगार जमा करण्यास सुरुवात केली.