Sambhajinagar Municipal Corporation's ward structure finalised
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीची उलटी गणती आता सुरू झाली आहे. प्रभाग रचनेवरील आक्षेपांच्या सुनावणीनंतर बुधवारी (दि. २४) राज्य निवडणूक आयोगापुढे महापालिका प्रशासनाने सुधारित आराखड्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणावर समाधान व्यक्त करत आयोगाने प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याला अंतिम मान्यता दिली. त्यामुळे ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान ही अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे जाहीर होणार आहे.
शहरात निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात होणार असून, दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके वाजणार आहेत. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच प्रभाग पद्धती लागू होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह आणि धाकधूक अशी दुहेरी भावना दिसत आहे.
महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करून शासनाला सादर केला होता. शासनाने मंजुरी देत तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला. त्यानंतर आयोगाने तो आराखडा आक्षेप-सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.
आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल ५५२ आक्षेप प्राप्त झाले. मात्र त्यातील अडीचशे नागरिकच सुनावणीत उपस्थित राहिले. बहुतेक तक्रारी प्रभागांच्या नकाशांतील विसंगती आणि व्याप्तीबाबत होत्या. त्यानुसार महापालिकेने तातडीने नकाशे सुधारित करून त्रुट्या दुरुस्त केल्या. सुधारित आराखडा महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला.
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर शहरातील राजकीय चर्चांना वेग आला आहे. कोणत्या प्रभागातून कोण उतरते, कोणत्या पक्षाला आरक्षणाचा लाभ होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांतच निवडणुकीची रणधुमाळी प्रत्यक्षात दिसू लागेल, यात शंका नाही.
▶ ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार.
▶ त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभागांची माहिती स्पष्ट होईल.
▶ त्यानंतर महापौरपदासाठी तसेच वॉर्डामधील आरक्षणासाठी सोडत काढण्यात येईल.
▶ आरक्षण प्रक्रिया पूर्ण होताच निवडणुकीच्या तारखांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.
बुधवारी दुपारी दोन वाजता आयोगासमोर महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सादरीकरण केले. आराखडा तयार करण्यामागील सर्व प्रक्रिया व कारणमीमांसा त्यांनी स्पष्ट केली. यावेळी महापालिकेचे तीन वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. सादरीकरणातील सविस्तर माहिती पाहून आयोगाने आराखड्यावर शिक्कामोर्तब केले. यावेळी महापालिकेला कोणत्याही त्रुटींचा सामना करावा लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.