

24 people duped of Rs 16 lakhs by promising jobs in bank
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खासगी बँकेत नोकरीचे आमिष दाखवून तीन भामट्यांनी २४ तरुण-तरुणींकडून तब्बल १५ लाख ७० हजार रुपये उकळून गंडा घातला. त्यांना कोटक महिंद्रा बँकेत नियुक्ती मिळाल्याचा बनाव रचण्यात आला. हा प्रकार ३ फेब्रुवारी ते २३ सप्टेंबरदरम्यान प्लॉट क्र. १, व्हीए-चएस, प्लॉट क्र. २०, चेतक घोडा चौक भागात घडला. सुदेश आंबिनाथ पाटील, कोटक बँकेचा एचआर रूपेश पठारे (मुंबई) आणि वसंत बापट (रा. अहिल्यानगर) अशी भामट्यांची नावे आहेत.
फिर्यादी सौरव संजय नरवडे (२५, रा. मुकुंदवाडी) याच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारीत सोशल मीडियावर नॅशनल अकादमी ऑफ बँकिंगची जाहिरात पहिली. ९० दिवसांचा ऑनलाईन बँकिंग कोर्स केल्यास बँकेच्या क्रेडिट विभागात १०० टक्के नोकरीची हमी अशी जाहिरात होती. अकादमीत चौकशीसाठी गेल्यावर आरोपी सुदेश पाटील भेटला. त्याने अकादमीचा मालक असल्याचे सांगून बँकेत २५ ते ३५ हजारांच्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर अकादमीत कामाला असलेल्या मुलींनी ९० दिवसांचा बँकिंग कोर्ससाठी ३५ हजार रुपये फीस तीन टप्प्यांत भरावी लागेल. नोकरी लागल्यानंतर आणखी ३५ हजार द्यावे लागतील, असे सांगितले. शैक्षणिक कागदपत्रे, आधार, पॅन, कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या. ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरल्यानंतर पाटीलच्या फोनपेवर साडेसात हजार पाठवले.
एक महिना बँकिंग विषयावर माहिती देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात पुन्हा साडेसात हजार पाठवले. ९० दिवसांचा कोर्स पूर्ण झाला. सौरवला तुझी कोटक महिंद्रा बँकेत, शिवाजी नगर, निराला बाजार, मोंढा नाका कंदी टॉवर येथे असिस्टंट क्रेडिट मॅनेजर म्हणून निवड झाली असून, तुला जवळची शाखा कोणती ते सांग तुझे नियुक्तीपत्र काढण्यास सांगतो, असे सुदेश पाटीलने सांगितले. उर्वरित फीस पाठवण्यास सांगितल्याने ३० जूनला सौरवने ३५ हजार व ३ जुलैला २० हजार रोखीने असे ७० हजार दिले. तेव्हा पाटीलने त्याला १५ दिवसांत बँकेतर्फे व्हेरिफिकेशन व त्याच्या दहा दिवसांनी बँकेकडून ईमेल आल्यावर तुला जॉईन करावे लागले, असे सांगितले.
सौरवला १२ जुलै रोजी एम के साबळे याने फोन करून कोटक बँकेतून व्हेरिफिकेशनसाठी आल्याचे सांगितले. तुमची बँकेत निवड झाल्याने वास्तव्याची पडताळणी करायची आहे. तेव्हा सौरवच्या घरी येऊन साबळेने सर्व कागदपत्रे घेऊन घरासमोर सौरवचा फोटो काढून घेतला. १५ दिवसात कन्फर्मेशन लेटर ईमेल येईल असे सांगितले. १५ जुलैला ईमेलवर कोटक रिक्रूटमेंट टीमच्या बोगस मेलवरून ओटीपी आला. त्यावरून शंका आल्याने त्याने कोटक बँकेत जाऊन चौकशी केल्यावर अशी कोणतीच भरती होत नसल्याचे सांगण्यात आले.
आरोपी सुदेश पाटील, ऑनलाईन झूम मिटिंग घेणारे रुपेश पठारे, वसंत बापट यांनी सौरव प्रमाणेच आकांक्षा निकम, पूजा राजनकर, कृष्णा निगडे, अभय खरात, सुहास खडसे, महेश घुगे, योगेश लांडगे, अमोल सोनटक्के, शुभम महाले, यश कदम, संग्राम ढोण, शुभांगी गडक, प्रीती शेवाळे, साहसिन जाधव, राज ठाकरे, शुभम शिलावत, निकिता खटाने, साहिल बुराण, ओंकार गडवे, अश्विनी तांगडकर, मोहित वडगर, यशराज आनंद आणि विशाल घुनावत यांची मिळून १५ लाख ७० हजाराची फसवणूक केली. कार्यालयाला कुलूप लावून पसार झाले. याप्रकरणी या मुलांनी पोलिस आयुक्तांना तक्रार केली होती. त्यानंतर जवाहर नगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२३) गुन्हा नोंद झाला. अधिक तपास उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करत आहेत.