छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला तब्बल साडेपाच वर्षांच्या प्रशासकराजनंतर पदाधिकारी मिळाले. मात्र अर्थसंकल्पीय सभेत प्रभागांच्या विकासकामांवर गांभीर्याने चर्चा करून तरतुदी करण्यावर भर देण्याऐवजी निधी वाटपात भेदभाव झाल्याचा आरोप विरोधकांनी केले. त्यासाठी शेरोशायरीतून विरोध दर्शविला. अखेर मोह न आवल्याने महापौर, उपमहापौरांनी शेरोशायरीतून प्रत्युत्तर दिले.
महापालिकेत सध्या रिल्सचे वारे जोरात वाहत आहे. यात एमआयएम पक्षाचे नगरसेवकांसह विरोधी पक्षनेते आघाडीवर आहेत. अधिकाऱ्यांना धमकावण्याचेच व्हिडिओ त्यांच्याकडून व्हायरल केले जात आहेत. परंतु विकासकामे आणि कर भरणा करण्याबाबत एकही रिल एमआयएमकडून अद्याप तयार करून व्हायरल करण्यात आली नाही.
सोमवारी अर्थसंकल्पीय सभेत एमआयएमने सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकामांच्या रिल्सचा मुद्दा पुन्हा मांडला. त्यावरून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला.
अखेर रिल्सच्या विषयावरून सभेत शेर-ोशायरीला सुरुवात झाली. यात विरोधीपक्ष नेता समीर साजेद बिल्डर यांनी निधी वाटपातील दुजाभाववर कत्ल तो हमेशा हमारा ही होता है, कभी खंजर बदलते है, तो कभी कातिल, हा शेर सादर केला.
अखेर त्यावर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी उंगलीया यू ना सब पर उठाया करो, खर्च करने से पहले कमाया करो, जिन्दगी क्या है, खुदही समज जाओगे, बारीशो मे पतंगे उडाया करो, हम कहा, हमारी मंजिल कहा, हम जैसे को मुह मत लगाया करो, या शेरद्वारे विरोधीपक्ष नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
त्यावर पुन्हा एमआयएमचे नगरसेवक ओसामा कदीर मौलाना यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी महापौरांकडे अट्टाहास केला. त्यामुळे अर्थसंकल्पीय सभेऐवजी मुशायऱ्यांचा कार्यक्रम असल्याचेच चित्र निर्माण झाले होते. अखेर यात महापौरांनाही मोह आवला नाही. त्यांनीही सभेचा समारोप शेरोशायरीनेच केला.
महापौरांची शेरोशायरी
सभेचा समारोप करताना महापौर समीर राजुरकर यांनी दुष्यंत कुमार यांच्या सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सारी कोशीश है की, ये सुरत बदलनी चाहिए, या चार ओळी सादर केल्या. यातून शहराचा विकास साधयचे असल्याचे विरोधकांना सांगितले.