Nashik NMC Budget | असमान निधी वाटपावरून महासभेत गदारोळ

विरोधकांकडून राजदंड पळविण्याचा प्रयत्न : 'उबाठा' नगरसेविका भारती ताजनपुरेंचे निलंबन
नाशिक महापालिका अंदाजपत्रकीय महासभा
नाशिक : अंदाजपत्रकीय महासभेत निधी वाटपावरून झालेल्या गोंधळात राजदंडाची पळवापळवी करणाऱ्या विरोधी पक्षातील नगरसेवकांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देताना महापौर हिमगौरी आहेर-आडके.छायाचित्रे : हेमंत घोरपडे
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत सोमवारी (दि. ३०) अभूतपूर्व गोंधळ उडाला. सत्ताधाऱ्यांनी निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत विरोधकांनी पीठासनावर धावून जात सत्ताधारी तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना सभेचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सत्तेत सहभागी असूनही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली गेली नसल्याचा संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने गोंधळात भर पडली.

नाशिक महापालिका अंदाजपत्रकीय महासभा
Sinner Parking Dispute Crime | दुचाकी पार्किंगच्या वादातून एकाचा खून, धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला

या गोंधळात राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाल्याने राजदंडाला हात घालणाऱ्या शिवसेना उबाठाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केली. महापौरांच्या या कठोर कारवाईमुळे विरोधकांनी एक पाऊल मागे घेतले. ताजनपुरे यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती विरोधकांनी केल्यानंतर महापौरांनी ही मागणी मान्य करत यापुढे सभागृहाची शिस्त न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा विरोधकांना दिला.

नाशिक - असमान निधी वाटपाचा आरोप करत पीठासनासमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करणारे विरोधी पक्षातील नगरसेवक.
नाशिक - असमान निधी वाटपाचा आरोप करत पीठासनासमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करणारे विरोधी पक्षातील नगरसेवक.

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची अंदाजपत्रकीय महासभा सोमवारी बोलवण्यात आली होती. स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वीच विरोधकांकडून सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. सत्ताधारी गटातील नगरसेवकांना अडीच कोटी तर विरोधी पक्षातील नगरसेवकांना फक्त दीड कोटी विकास निधी देऊन सत्ताधाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप करत उबाठा गटनेते केशव पोरजे, भारती ताजनपुरे यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी पीठासनावर धावून जात पत्राचे वाचन करण्याची मागणी केली.

नाशिक महापालिका अंदाजपत्रकीय महासभा
Leopard News : बिबट्याचा थरार; पाच तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद

'समान हक्क, समान निधी आमची ठाम मागणी', 'निधीवर राजकारण बंद करा, जनतेचा हक द्या', 'सत्ताधाऱ्यांची मनमानी चालणार नाही', 'निधीवाटपात दुजाभाव करणाऱ्यांचा धिक्कार असो', 'राजकारण नको विकास हवा निधी वाटपात पारदर्शकता हवी' अशा आशयाचे फलक झळकवत उबाठा, काँग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे, नगरसेवक मुकेश शहाणे, योगेश भोर, जागृती गांगुर्डे यांनीदेखील पीठासनासमोर धावून जात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी गत महासभेत ठराव मंजूर होऊन देखील अंदाजपत्रकात तरतूद का केली गेली नाही असा जाब विचारला.

सत्तेत सहभागी असूनही अजितदादांचा अपमान केला गेला जात असेल तर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी संतप्त भूमिका मुकेश शहाणे यांनी मांडली. यावेळी प्रतिकार करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नगरसेवकही पीठासनासमोर धावले. महापौर आहेर यांनी सर्व सदस्यांना जागेवर बसण्याची सूचना करताना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र विरोधक अधिकच आक्रमक बनल्याने महापौरांनी महासभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

महासभा तहकुबीनंतरही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरूच राहिली. गोंधळातच महासभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी उत्बाठाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे महापौरांनी ताजनपुरे यांना सहा महिने निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाली. विरोधकांना नाशिकची प्रगती नको आहे का, असा सवाल करत गोंधळ घालणारे नगरसेवक पीठासनासमोरून खाली उतरून जागेवर न बसल्यास सर्व सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा थेट इशारा महापौरांनी दिला. यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली. यानंतर महापौरांनी सुरक्षारक्षकांना आदेश देत ताजनपुरे यांना सभागृहाबाहेर सन्मानपूर्वक नेण्याचे आदेश दिल्याने सभागृहात पुन्हा गोंधळ सुरू झाला. या गोंधळातच सभापती सानप यांनी महापौरांना अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेचे सादरीकरण केले.

विरोधी पक्षांतील सदस्यांबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नगरसेवकांनीदेखील ताजनपुरे यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती महापौरांना केली. कारवाई झालेल्या नगरसेविका महिला आहेत महापौरही महिला आहेत त्यामुळे महिला नगरसेविकेचे दुःख ओळखून महापौरांनी ही कारवाई मागे घ्यावी, असा आग्रह विरोधकांकडून धरला गेला. सभागृहाची शिस्त मोडणारा नगरसेवक महिला असो वा पुरुष यापुढे कोणालाही संधी दिली जाणार नाही, असा थेट इशारा देत महापौरांनी ताजनपुरे यांचे निलंबन मागे घेतले.

सभा नियमावली पुस्तिकेचे वाटप

गोंधळ शमल्यानंतर महापौरांनी सभागृहातील सर्व सदस्यांना सभा कामकाज नियमावलीच्या पुस्तिकेचे वाटप करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांना या पुस्तिकेचे वाटप केले गेले. सभागृहाच्या कामकाजात कसा भाग घ्यावा, कसे नियम पाळावेत याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी, अशा सूचना महापौरांनी केल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news