Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : बहिणीला का छेडतो ? म्हणत १० वीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

बहिणीला का छेडतो ? म्हणत १० वीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : खासगी शिकवणीवरून नमाज पठणासाठी जात असलेल्या एका १६ वर्षीय शाळकरी मुलाला भररस्त्यात अडवून, तू आमच्या बहिणीला का छेडतोस? असा जाब विचारत दुचाकीवर बळजबरीने बसवून त्याचे अपहरण केले. त्याला मोतीवाला नगर भागातील एका कार्यालयात नेऊन शिवीगाळ व बेदम मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा आणून शिकवणीजवळ सोडून दिले.

ही घटना सोमवारी (दि. १९) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास सुमैरा हॉस्पिटलसमोर, करीम कॉलनी भागात घडली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात ३ ते ४ अनोळखी तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपीही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी जुना मोंढा भागातील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो देवडी बाजार परिसरातील एका शाळेत इयत्ता १० वीत शिकत असून, मकसूद कॉलनीतील कोचिंग क्लासेस येथे खाजगी शिकवणीला जातो. सोमवारी सायंकाळी सहा वाजता तो नेहमीप्रमाणे क्लासला गेला होता.

सव्वासहा वाजेच्या सुमारास नमाजची वेळ झाल्याने तो मशिदीकडे पायी जात होता. त्याचवेळी बर्गमॅन आणि डिओ मोपेडवरून ३ ते ४ तरुण त्याच्याजवळ आले. त्यातील एकाने, त्याचे नाव घेत तूच आहेस का? अशी विचारणा केली. विद्यार्थ्याने हो, काय काम आहे? असे विचारताच, आमच्यासोबत चल, तुझ्याशी काम आहे, असे दरडावले.

विद्यार्थ्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. तेव्हा बर्गमॅन मोपेडवरील दोन मुलांनी त्याला बळजबरीने गाडीवर बसवले. सेंट्रल नाका मार्गे अपेक्स हॉस्पिटलच्या पाठीमागे, मोतीवाला नगरातील एका गल्लीतील घरात व नंतर एका कार्यालयात नेले. तेथे त्याला तू आमच्या बहिणीला का छेडतोस? असा आरोप करत शिवीगाळ सुरू केली. विद्यार्थ्याने नकार देण्याचा प्रयत्न केला असता त्याला बेदम मारहाण केली. जर तू पोलिसांत तक्रार दिली, तर तुला सोडणार नाही अशी धमकीही हल्लेखोरांनी दिली.

घाबरलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना दिली माहिती

मारहाण केल्यानंतर त्यातील एका तरुणाने स्वतःचा मोबाईल क्रमांक विद्यार्थ्याला दिला. त्यानंतर सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास त्याला पुन्हा डिओ मोपेडवर बसवून आणले आणि कोचिंग क्लासेसजवळ सोडून सर्वजण पसार झाले. घाबरलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांसह जिन्सी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुकुंद मुंडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT