Sambhajinagar Mahant Ramgiri Maharaj Harinam Saptah
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : दुष्ट विचारांच्या माणसाला हरिनामाची आवडत प्राप्त झाल्यानंतर तो वाईट संगतीच्या लोकांपासून दूर राहतो. अग्नी ज्याप्रमाणे लाकडाचे भस्म करते त्याप्रमाणे हरिनाम रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते, मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही, परंतु संतांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जीवनात बदल होतो, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
सद्गुरू गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशीच्या प्रवचन पुष्प गुंफताना ते बोलत होते. भगवंताचे स्मरण हीच खरी संपत्ती आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी काही थोरामोठ्यांचे, संतांचे चरित्र पाठ्यपुस्तकांत होते आज ते नाहीत, त्यामुळेच आजची पिढी बिघडत चालली असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियामुळे मनोविकार वाढत आहे त्याला जबाबदार कोण असा सवाल करत ? ते सुधारण्यासाठी अध्यात्म -संस्कृतीची गरज आहे परमार्थ हे महाधन आहे, रामनाम रूपी ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत आहे.
जगामध्ये कोणी धनवान नाही. लक्ष्मीचा जेथे मोठेपणा चालला नाही, तिथे आपण कोण? सिकंदर जब दुनिया से चला तब दोनो हात खाली थे असे सांगत महाराज म्हणाले, जग जिंकले, कितीही संपत्ती असली तरी आपण काही घेऊन जात नाही. आशेमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. महंत रामगिरी महाराज म्हणाले, अनावश्यक चिंतन हे दुःखाचे कारण आहे. उन्मत हत्ती सारखे मन धावत असते. मनाला अंकुश पाहिजे. मन रथांच्या चाकाप्रमाणे फिरत राहाते त्याला मनोरथ म्हणतात. मोबाईलचा वाढता अतिवापर यामुळे मनुष्य दिशाहीन झाला आहे असे यावेळी ते म्हणाले.