छत्रपती संभाजीनगर : आखाती देशात भडकेल्या युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याने दीड महिन्यानंतरही परिस्थिती सुधार-लेली नाही. बुकिंग केल्यानंतर सिलिंडरसाठी १२-१२ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे कडक उन्हातही शहरातील विविध गॅस एजन्सींवर सिलिंडरसाठी रांगा लागल्याचे चित्र कायम असल्याने या टंचाईत ग्राहक अक्षरशः होरपळून निघत आहेत.
इराण-इस्रायल व अमेरिका यांच्यात पेटलेल्या संघर्षामुळे दीड महिन्याभरापासून गॅसचा पुरवठा विस्कळीतच आहे. सुरुवातील टंचाईच्या भीतीने पॅनिक झालेल्या ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने बुकिंग केली. त्यामुळे वेटिंग यादी हजारोच्या घरात पोहोचली. त्यात शासन, गॅस वितरक कंपन्यांकडून नवीन नियमांमुळे गॅस पुरवठ्याचा अवधी वाढला आहे.
बुकिंगनंतरही सिलिंडरसाठी ग्राहकांना १२ ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅस टंचाईचे चटके थेट स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. ही परिस्थिती दोन महिने होत आले तरी सुधारलेली नाही. गॅस सिलिंडरसाठी शहरातील विविध गॅस वितरण एजन्सीजवर ग्राहकांच्या रांगा आणि गर्दी दिसून येत आहे.
पुरवठ्याच्या तिप्पट बुकिंग अन् वेटिंग
गॅस टंचाईनंतर शहरातील जवळपास सर्वच एजन्सींवर रोजच्या सिलिंडर पुरवठ्याच्या दुप्पट-तिप्पट बुकिंग आणि वेटिंग आहे. त्यातच वितरक कंपन्यांनी घरगुती गॅसचा पुरवठा घटवला आहे. त्यामुळे तेवढ्या अधिक संख्येने सिलिंडरसाठी वेटिंग लिस्ट रोज वाढत असून, आजघडीला प्रत्येक एजन्सींवर हजारो ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत आहेत.