Sambhajinagar Jalna Road water channels
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरांतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. या कामातही मुख्य जलवाहिन्यांप्रमाणेच चुका होत असून, मुख्य रहदारीच्या जालना रोडवर एक फुटाच्या अंतराने एकाखाली एक तीन जलवाहिनी अंथरण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात यातील एक जलवाहिनी फुटली तर दुरुस्तीसाठी तिन्ही जलवाहिन्याचे पाणी बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर ओढावण्याची दाट शक्यता आहे.
शहरवासीयांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य शासन २७४० कोटी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र हजारो कोटी खर्चुनही जलवाहिनीचे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. जलवाहिन्या अंथरताना अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या चुका एमजेपी आणि कंत्राटदार जीव्हीपीआरकडून झाल्या आहेत. पैठण रस्त्यामध्ये टाकलेल्या जलवाहिनीचा प्रकार आता कुठे थंड झाला आहे.
आता शहरांतर्गत जलवाहिन्याचे कामही अशाच चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. दुध डेअरी ते मोंढा नाका दरम्यान मुख्य रहदारीच्या रस्त्यामधून ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. ही जलवाहिनी जुन्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अगदी एक फूट अंतर सोडून टाकण्यात येत आहे. त्यावर अर्घाफूट जागा सोडून आणखी एक ३०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली जात आहे. यात एकही जलवाहिनी भविष्यात फुटली, तर दुरुस्ती करताना महापालिकेची दमछाक होणार हे मात्र निश्चित आहे. असे असतानाही या कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
जलवाहिन्या एकाखाली एक टाकताना प्रत्येक जलवाहिनीवर सिमेंट काँक्रीट टाकण्यात येत आहे. त्यामुळे अडचण येणार नाही, असे एमजेपीकडून सांगण्यात येत आहे. तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या कामावर आक्षेप घेतला आहे.