Illegal construction owners give possession municipality free, says municipal administrator Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी केली याचा अर्थ त्या मालमत्ताधारकाला मोबदला मिळेल, असे नाही. जे बांधकाम विनापरवाना होते तेच महापालिकेने पाडले. त्यामुळे आता ज्यांचे अर्धे बांधकाम शिल्लक आहे, त्यांनी त्यांची गुंठेवारी करून घ्यावी व बाधित झालेली जागा महापालिकेला फीमध्ये हस्तांतरित करावी, हाच नियम असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (दि.१) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच ज्यांचे संपूर्ण बांधकामच यात बाधित झाले असेल तरच त्यांना मोबदला मिळेल, असेही ते म्हणाले.
रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर पाडापाडी केली. रुंदीकरण आड येणारी अनधिकृत व अतिक्रमित व्यावसायिक बांधकामे पाडली. या कारवाईला एक महिना झाला आहे. ज्या ज्या रस्त्यांवर पाडापाडी केली, त्या त्या रस्त्यांवर अद्याप महापालिकेने काम सुरू केले नाही. महापालिका रस्त्यांची कामे केव्हा करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तसेच ज्यांच्या मालमत्ता पाडण्यात आल्या, त्यांच्या मोबदल्याचे काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यावर शुक्रवारी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, ज्या बांधकामांना महापालिकेची परवानगी नव्हती आणि जी बांधकामे अतिक्रमित होती.
तीच या मोहिमेत पाडली आहेत. या मालमत्तेचा जेवढा भाग रुंदीकरणात बाधित होतो, तेवढाच भाग पाडल्याने आता बाधितांनी उर्वरित जागेतील शिल्लक असलेले बांधकाम गुंठेवारीनुसार नियमित करून घ्यावे. गुंठेवारीची ही प्रक्रिया राबविताना मालमत्ताधारकाला कलम ३२ क नुसार बाधित जागेचा महापालिकेला फ्री ताबा द्यावा लागातो, असेही प्रशासक म्हणाले. त्यानुसारच सध्या जी जी बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत, त्यांना बाधित जागेचा मोबदला मिळणार नाही, असेही प्रशासकांनी स्पष्ट केले.
रोख मोबदल्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा
महापालिकेने टीडीआरची सक्ती केलेली नाही, असे सांगताना प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, रोखीने मोबदला देण्यास महापालिका तयार आहे. परंतु या मोबदल्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. जेव्हा रस्त्याचे काम केले जाईल, त्यावेळी संबंधितांना रोखीने मोबदला दिला जाईल.