सांत्वन करून येतानाच ज्येष्ठ दाम्पत्यावर काळाचा घाला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident : सांत्वन करून येतानाच ज्येष्ठ दाम्पत्यावर काळाचा घाला

भरधाव कारच्या धडकेत पती-पत्नी ठार : परिसरावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Husband and wife killed in speeding car crash

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पडेगाव परिसरातील आर्च आंगणमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकांच्या घरी निधनाची घटना घडली होती. त्यांचे सांत्वन करून पायी परत येताना ज्येष्ठ दाम्पत्यावर काळाने घाला घातला. भरधाव जाणाऱ्या कारचालकाच्या धडकेत या पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी ६.३० च्या सुमारास पडेगाव रस्त्यावर झाली. रामराव आत्माराम माने (७१) आणि रत्नमाला रामराव माने (६४ दोघे रा. देशमुखनगर, मिटमिटा) असे ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामराव माने हे विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक होते तर त्यांची पत्नी रत्नमाला या उच्च न्यायालयात वकील होत्या. माने दाम्पत्य मूळचे रुईभर (ता. धाराशिव) येथील होते. त्यांचे एक नातेवाईक आर्च आंगण येथे राहतात. त्यांच्या घरी निधनाची दुःखद घटना घडली होती. नातेवाईकांच्या सांत्वनासाठी ते दोघेही पायी गेले होते. भेटून सायंकाळी साडेसहा वाजता परत घराकडे पायी येत होते. पडेगावचा रस्ता ओलांडत असताना शहरातून दौलताबाद टी पॉइंटकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने दोघांनाही जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रामराव माने आणि रत्नमाला माने हे दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळख

डॉ. माने हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९८० ते २०२४ या काळात रसायनशास्त्र विभागात कार्यरत होते. २००६ ते २०१० या काळात अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. या दाम्पत्यास मूलबाळ नसल्याने ते विद्यार्थ्यांनाच आपले मुले मानत होती. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. त्यामुळे विद्यापीठात त्यांची विद्यार्थीप्रेमी प्राध्यापक म्हणून ओळख होती. या घटनेचे वृत्त कळताच त्यांचे विद्यार्थी, सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

रुईभर येथे अंत्यसंस्कार

या दाम्पत्याच्या पार्थिवावर धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथे रविवारी (दि.२६) अंत्यसंस्कार होणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व अॅडव्होकेट दाम्पत्याच्या अपघाती मृत्यूची बातमी चटका लावणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT