Sambhajinagar Gram Panchayat reservation pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Gram Panchayat reservation : जिल्ह्यातील ६१७ ग्रा.पं. तींचे आरक्षण अंतिम

उर्वरित २१ ग्रामपंचायतींची अंतिम अधिसूचना २४ जुलैला; त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ६३८ ग्रामपंचायतींच्या आरक्षण प्रक्रियेला अंतिम टप्पा आला आहे. आरक्षण निश्चितीतील त्रुटीमुळे गंगापूर, पैठण आणि सोयगाव तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणाची सोडत पुन्हा घेण्यात आली होती. या ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींची अंतिम अधिसूचना सोमवारी (दि. १३) प्रसिद्ध करण्यात आली. तर उर्वरित २१ ग्रामपंचायतींमध्ये आक्षेप मंजूर झाल्याने नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यांची अंतिम अधिसूचना २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायतींसाठी काढलेल्या प्रारूप आरक्षणावर १९ ते २५ जूनदरम्यान हरकती व आक्षेप मागविण्यात आले होते. या कालावधीत एकूण २२९ हरकती प्राप्त झाल्या. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर बहुतांश ग्रामपंचायतींचे आरक्षण योग्य असल्याचे स्पष्ट झाल्याने १० जुलै रोजी ५९५ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

दरम्यान, गंगापूर तालुक्यातील १५, पैठणमधील ५ आणि सोयगावमधील २ अशा २२ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चितीत त्रुटी आढळल्याने राज्य निवडणूक आयोगाने नव्याने सोडत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २९ जून रोजी पुन्हा आरक्षण सोडत पार पडली. या प्रक्रियेवरही १० आक्षेप दाखल झाले होते. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांनी ते फेटाळून लावत या ग्रामपंचायतींची अंतिम अधिसूचना सोमवारी प्रसिद्ध केली.

याशिवाय, आणखी २१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणावर दाखल झालेल्या आक्षेपांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार असून त्याची अंतिम अधिसूचना २४ जुलै रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ६३८ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित होणार असून मतदार याद्या निश्चित करण्याच्या कार्यक्रमालाही गती मिळण्याची शक्यता आहे.

२४ जुलैला अंतिम अधिसूचना होणाऱ्या ग्रामपंचायती

पैठण - १५

फुलंब्री - ४

गंगापूर - १

सिल्लोड - १

एकूण : २१ ग्रामपंचायती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT