

Jalna News : 85 objections from 71 gram panchayats on ward draft reservation
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ४७२ जुन्या व ३ नव्या अशा एकूण ४७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून, प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणावर दाखल झालेल्या हरकतींच्या सुनावणीला आज, शुक्रवार (दि. ३) पासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ७१ ग्रामपंचायतींकडून एकूण ८५ आक्षेप दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप आरक्षण अधिसूचनेला मान्यता दिली, तर १९ जून रोजी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.
प्रारूप आरक्षणावर नागरिकांकडून १९ ते २५ जून या कालावधीत सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत जिल्ह्यातील ७१ ग्रामपंचायतींकडून ८५ आक्षेप दाखल झाले. या आक्षेपांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण निश्चित करण्यात झालेली विसंगती, संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या कमी असतानाही त्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित होणे, तसेच ज्या प्रवर्गाची लोकसंख्या अधिक आहे त्याऐवजी अन्य प्रवर्गाला आरक्षण मिळाल्याबाबतच्या हरकतींचा समावेश आहे.
यापूर्वी ग्रामपंचायतींची प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातून ११२ आक्षेप दाखल झाले होते. त्या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण करून त्यानंतर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आता प्रारूप आरक्षणावरील हरकतींवर सुनावणी होऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम आरक्षणाला मंजुरी मिळणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला, तरी प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू केल्याने ग्रामीण भागातील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.
दरम्यान, सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. सहा महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रभागनिहाय आरक्षण सोडत घेण्यात आली. त्यावर सुमारे ७१ आक्षेप नोंदवण्यात आले आहे. यामुळे गावातील निवडणुकीपूर्वीच राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हाभरातील गाव पुढारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार
जालना जिल्ह्यातील सुमारे ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. प्रारंभी प्रभागनिहाय प्रारूप आराखड्यावर सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे. यामुळे आपला प्रभाग आरक्षित होतो की नाही, कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवल्यास फायदा होईल. आपले मतदार कोणत्या प्रभागात जात आहे, याचे सगळे गणितं गाव पुढारी जुळवित आहे. त्यामुळे निवडणुकीला अजून अवकाश असला तरी गाव पुढाऱ्यांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधले असल्याचे दिसून येत आहे.