Graduate Constituency Election 2026 pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Graduate Constituency Election 2026 : पदवीधर निवडणूक : मतदानासाठी १,१६५ पोलिसांचा फौजफाटा

शुक्रवारी (दि.२३) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ०५-औरंगाबाद भारत विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ ची मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मतदानाच्या दिवशी ४ पोलिस उपायुक्त, ८ सहायक पोलिस आयुक्त, २७ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, ९७१ पुरुष अंमलदार, १२२ महिला अंमलदार असा तब्बल १ हजार १६५ पोलिस अधिकारी व अंमलदारांसह राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) एक कंपनी खडा पहारा देणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव यांनी दिली.

शुक्रवारी (दि.२३) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. तर मंगळवारी (दि. २७) सकाळी आठ वाजेपासून एमआयडीसी चिकलठाणा येथील मे. रिसॉन्टे लॉजिस्टिक एलएलपी (प्लॉट क्र. ई-५४) येथे ही मतमोजणी पार पडेल.

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरावर पोलिसांची करडी नजर राहणार असून, बाहेरील भागात संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी साध्या गणवेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिस सेक्टर पेट्रोलिंग, महसूल क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्ट्रायकिंग पथके, नियंत्रण कक्ष राखीव पथक, दंगल नियंत्रण पथक आणि शीघ्र कृती दल सज्ज ठेवण्यात आले आहे.

मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी १ पोलिस उपायुक्त, ३ सहायक पोलिस आयुक्त, १५ पोलिस निरीक्षक, ५४ सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक, ५२९ पुरुष अंमलदार आणि ११० महिला अंमलदार असे एकूण ७१२ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. मतमोजणी केंद्रावरही एसआरपीएफची १ कंपनी स्वतंत्रपणे तैनात राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT