Gangapur Robbery Case
गंगापूर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन कायगाव शाखेतील कॅशिअरकडील सुमारे पाच लाख रुपयांची रोकड दुचाकीस्वार दोन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) सकाळी गणेशवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली असून बँकिंग क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल जगन्नाथ चव्हाण (वय ५०) हे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन कायगाव शाखेत कॅशिअर म्हणून कार्यरत आहेत. शाखेच्या दैनंदिन व्यवहारांसाठी आवश्यक असलेली रोकड ते नियमितपणे गंगापूर शाखेतून आणत असतात.
सोमवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजता चव्हाण हे सहकारी कर्मचारी अनिल राधाकिसन रोकडे यांच्यासह गंगापूर शाखेत गेले होते. तेथून त्यांनी ५ लाख रुपयांची रोकड घेतली. या रकमेत १०० रुपयांच्या १ हजार नोटा, २०० रुपयांच्या १ हजार नोटा आणि ५०० रुपयांच्या ४०० नोटांचा समावेश होता.
रोकड पिवळ्या रंगाच्या बॅगेत ठेवून दोघेही दुचाकीवरून नवीन कायगावकडे निघाले. चव्हाण दुचाकी चालवत होते, तर अनिल रोकडे हे मागे बसून रोकड असलेली बॅग हातात धरून होते. शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, त्रिकोणी चौक आणि पोस्ट ऑफिस मार्गे ते गणेशवाडी परिसरात पोहोचले असता ही घटना घडली.
गणेशवाडी गावालगत रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने दुचाकीचा वेग कमी झाला. याच संधीचा फायदा घेत मागून भरधाव आलेल्या मोटारसायकलवरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या दुचाकीजवळ येत रोकड असलेल्या पिशवीवर झडप घातली. आरोपींनी बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याने काही क्षण झटापट झाली. मात्र जोरजबरदस्ती करत त्यांनी रोकड असलेली पिशवी ताब्यात घेतली आणि कायगावच्या दिशेने पळ काढला.
फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार, दुचाकी चालवणाऱ्या आरोपीने भुरक्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्याला दाढी असून बांधा सडपातळ होता. तर मागे बसलेल्या आरोपीने लाल रंगाचा अर्ध्या बाह्यांचा टी-शर्ट घातला होता आणि त्याचे केस लांब व कुरळे होते. दोघेही कायगावमार्गे पुढे महामार्गाच्या दिशेने पसार झाल्याचे सांगण्यात आले आहे.
भरदिवसा बँकेची रोकड लुटल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बँकेची मोठी रोकड नियमितपणे दुचाकीवरून वाहतूक केली जात असल्याने सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे व्यापारी, नागरिक आणि बँक कर्मचारी यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे वर्णन आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांचा फायदा घेत लुटीचा डाव
गणेशवाडी परिसरातील खराब रस्त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या दुचाकीचा वेग कमी झाला. याच क्षणाची संधी साधत दरोडेखोरांनी रोकड असलेल्या पिशवीवर झडप घातली आणि अवघ्या काही क्षणांत ५ लाखांची रोकड लंपास केली. या घटनेनंतर मोठ्या रकमेच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.