Sambhajinagar Encroachment Opposition Leader Danve Municipal Corporation Meeting
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरात रस्ता रुंदीकरणासाठी केलेली कारवाई चांगली आहे. परंतु या पाडापाडीत अनेकांच्या स्वमालकीच्या जागांवरील बांधकामे पाडली. यात परवानगी असलेल्यांचेही बांधकाम जमीनदोस्त केले असून, आतापर्यंत कोणाकोणाच्या किती मालमत्ता बाधित झाल्या, त्यांची आकडेवारी महापालिकेकडे आहे का, त्यांच्या मोबदल्याचे प्रशासनाने काय नियोजन केले आहे, असा सवाल शुक्रवारी (दि.८) महापालिकेत आयोजित बैठकीत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. परंतु आयुक्तच उपस्थित नसल्याने एकाही अधिकार्याला उत्तर देणे शक्य झाले नाही.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे, नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, शहर अभियंता फारुख खान, अविनाश देशमुख यांची उपस्थिती होती. महापालिकेच्या पाडापाडीसह इतर विविध विषयांचा आढावा शुक्रवारी दुपारी विधानपरिषद-`चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिकेत जाऊन घेतला. त्याअगोदर सकाळी सिडकोमध्ये एमजीएम हॉस्पिटललगत उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. कामाची गती वाढविण्यासह इतर सूचना त्यांनी केल्या. दुपारी साडेतीन वाजता त्यांनी महापालिका मुख्यालयात / पान बैठक घेतली. शहरात रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या पाडापाडीची माहिती त्यांनी दोन्ही अतिरिक्त आयुक्तांकडून जाणून घेतली.
प्रशासक जी. श्रीकांत हे शुक्रवारी पुण्यात यशदा येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांसह शहर अभियंता व इतर अधिकारीच या बैठकीला उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी पाडापाडीत ज्यांच्या मालमत्ता बाधित झाल्या, त्या सर्वांची यादी महापालिकेने तयार केली आहे का, ज्यांचे सरकारी जागेत अतिक्रमण होते, ते विनासूचना पाडणे योग्यच होते. परंतु ज्यांच्या स्वतःच्या जागा आहेत, त्यात त्यांनी बाधंकाम केले असेल तर त्यांच्या जागांचे भूसंपादन करताना महापालिकेला मोबदला तर द्यावाच लागेल. जर या प्रकरणात शासनाने सर्वप्रकारच्या बाधितांना आर्थिक मोबदला देण्याचे आदेश दिलेच तर प्रशासन काय करेल, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी बाधितांची यादी तयार करण्याची सूचना केली. तसेच कारवाईवर ताशेरे ओढले.
महापालिकेत दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. दलालांशिवाय एकही काम होत नाही. मनपा नसून, धंदा करणाऱ्यांचे कार्यालय झाले असल्याने दलालांची संख्या वाढली आहे. दलालांशिवाय टीडीआरची संचिकाच मंजूर होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
महापालिकेने शहरभर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पाडापाडीची कारवाई केली आहे. या मोहिमेत अनेक ठिकाणी गरिबांनी प्रशासनाकडे वेळ मागितला, परंतु त्यांचे ऐकले नाही अन् श्रीमंतांचे पाडले नाही, असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना रोडवरील त्या चार ते पाच मालमत्तांवर निशाणा साधला. तसेच कशाप्रकारे रस्ता आणि उड्डाणपूल वळविल्याबाबतही त्यांनी बैठकीत सांगितले.