

Organ donation from brain-dead person saves three lives
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ब्रेन डेड झालेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानातून एक, दोन नव्हे तीन जणांना नवे जीवन मिळाले. या ब्रेन डेड व्यक्तीच्या दोन्ही किडन्यांचे शहरात प्रत्यारोपण करण्यात आले. तर त्यांचे लिव्हर नागपूर येथील न्यू एरा मदर अँड चाईल्ड रुग्णालयात पाठवण्यात आले. ही अवयवदान प्रक्रिया गुरुवारी (दि. ७) शहरातील एका खासगी रुग्णालयात पार पडली.
याबाबत रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार इचलकरंजी येथून पाच वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झालेले हे ६० वर्षी व्यक्ती ४ ऑगस्ट २०२५ रोजी शहानूरमियों दर्गा परिसरातून दुचाकीवर जात असताना त्यांना अचानक चक्कर आली. पादचाऱ्यांनी कळवल्यानंतर नातेवाइकांनी तातडीने त्यांना बीड बायपास येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तरखाव झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना ब्रेन डेड घोषित केले. या अत्यंत दुःखदप्रसंगी डॉ. गोसावी यांनी ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाइकांशी चर्चा करत, त्यांच्या अवयवदानामुळे इतर रुग्णांना जीवनदान मिळू शकते, असे सांगितले, याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या पत्नी, दोन मुले आणि चार भावांनी एकमताने अवयवदानासाठी परवानगी दिली.
त्यानुसार गुरुवारी ब्रेनडेड व्यक्तीची अवयवदान प्रक्रिया पार पडली. यात एक किडनी बजाज रुग्णालयातील रुग्णाला, तर दुसरी किडनी एमजीएम रुग्णालयातील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आली. तसेच त्यांचे लिव्हर नागपूर येथील न्यू एरा मदर अँड चाईल्ड रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णालयातील सर्जन डॉ. ओसवाल आणि डॉ. शिवाजी तौर, आयसीयूतज्ज्ञ डॉ. विनोद गोसावी, डॉ. गीता फेरवानी, मेडिकल डायरेक्टर डॉ. अजय रोटे, सिनिअर कन्सलटंट डॉ. मिलिंद वैष्णव आणि सीईओ डॉ. जॉर्ज फर्नांडीस यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य या कार्यात मोलाचे ठरले. रुग्णालयाच्या वतीने या ब्रेनडेड व्यक्तीला मानवंदना देण्यात आली.
अवयदानासाठी पुढे येण्याचे आवाहन
मरणोत्तर जीवनाचा दीप उजळवा, यासाठी अवयवदान करा, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अवयवदानासाठी पुढे यावे, अशी जनजागृती करत अवयदान करण्याचे आवाहन करण्यात आले.