Sambhajinagar Encroachment Campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सलग दोन दिवस पैठण रोडवरील अतिक्रणाच्या कारवाईनंतर बुधवारी (दि.२) महापालिकेकडून एक दिवसासाठी मोहीम थांबवण्यात आली होती. त्यांनतर गुरुवारी (दि.३) पडेगाव ते मिटमिटा रोडवरील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारनंतर या भागात मार्किंग करून अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडून शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम २० जूनपासून हाती घेण्यात आली आहे. यात जालना रोडवरील मुकुंदवाडी, संजयनगरमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर बीड बायपास रोडवरील दुकाने हटवली.
तर शनिवारी २९ जून रोजी केंब्रीज चौक ते चिकलठाणा व रविवारी ३० जून रोजी धूत हॉस्पिटल ते एपीआय कार्नर रोडलगतचे शॉपिंग मॉल, पत्र्याचे शेड, घरे, इमारती यासह सर्वप्रकरची कच्ची व पक्की बांधकामे पाडण्यात आली. त्यानंतर मनपाने आपला मोर्चा पैठण रोडकडे वळवला.
यात सोमवार व मंगळवारी रेल्वेस्टेशन, महानुभव आश्रम तसेच कांचनवाडी ते नक्षत्रवाडी रोडवरील अतिक्रमण हटवण्यात आले. दरम्यान मंगळव ारी दुपारीनंतर पडेगाव भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ३० मीटर अंतरांपर्यंत मोजणी करून पथकाकडून मार्किंग करण्यात आली आहे. पडेगाव ते मिटमिटा रोडवरील अतिक्रणावर बुधवारी कारवाई करण्यात येणार होती.
मात्र काही कारणास्तव मनपाकडून एका दिवसापुरता ब्रेक घेण्यात आला. त्यामुळे कारवाई गुंडाळण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र गुरुवारी सकाळी आठ वाजताच पडेगाव येथे पथक धडकणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागप्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त संतोष बाहुळे यांनी दिली. दरम्यान पथकाकडून मार्किंग करण्यात आलेल्या भागातील अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमित भाग काढून घेतला आहे.