Sambhajinagar Due to black soil, it took 82 hours to install the water pump
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहराला अतिरिक्त २० एमएलडी पाणीपुरवठा करणारी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर काही अत्यावश्यक कामे करण्यासाठी रविवारी महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला १४ तासांचा शटडाऊन दिला होता. परंतु पाऊस आणि काळ्यामातीमुळे पंप बसविण्याच्या कामाला ८२ तास लागले. अखेर बुधवारी सायंकाळी जलवाहिनीची चाचणी घेत पाणीपुरवठा सुरू केला.
शहरवासीयांना दररोज मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनेसह शहराला १९३ कोटी रुपये खर्चाची नवीन ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी मंजूर केली. हे कामही शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फतच करून घेतले. मात्र नवीन मुख्य पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत या जलवाहिनीचे काम अतिशय जलदगतीने पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्यापही या योजनेसाठी आवश्यक असलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या जलवाहिनीतून शहराला पूर्ण क्षमतेने पाणी देणे शक्य झालेले नाही.
ही जलवाहिनी पूर्णक्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी महापालिका व एमजेपीचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी जायकवाडी पंपगृह आणि ढोरकीन या दोन ठिकाणी पंप बसविण्यासाठी रविवारी १४ तासांचा शटडाऊन एमजेपीने घेतला होता. या कामाला वेळेत सुरुवात झाली. परंतु, हे काम वेळेत पूर्ण झाले नाही.
उलट १४ तासांऐवजी तब्बल ८२ तासांचा आवधी काम पूर्ण होण्यासाठी लागला. त्यामुळे चार दिवसांपासून शहराचे २० एमएलडी पाणी कमी झाले असून, त्याचा फटका अनेक भागांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, जायकवाडी, ढोरकीन परिसरात मागील आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. त्यात काळ्यामातीमध्ये काम करावे लागल्याने अनेक अडचणी आल्या. त्यामुळेच कामाला उशीर लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मान्सूनचे अगमन होऊन तीन आठवडे पूर्ण होत आले आहे. मात्र अजूनही शहराच्या बहुतांश भागात उन्हाळ्याप्रमाणेच ८ ते १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात चार दिवस ९०० च्या जलवाहिनीचा पुरवठा बंद राहिल्याने पाणीपुरवठा आणखीच विस्कळीत झाला आहे.