Sambhajinagar Doctor brutally beats four-year-old child
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दात दुखत असल्याने चार वर्षांच्या चिमुकल्याला क्लिनिकमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरसह कंपाउंडरने त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ज्योतीनगर भागातील साई दातांचा दवाखाना येथे घडली. डॉ. राहुल बिराजदार (रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, ज्योतीनगर) आणि कंपाउंडर किरण अशी आरोपींची नावे आहेत.
प्रतापनगर भागात राहणाऱ्या फिर्यादी ३१ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांच्या ४ वर्षांच्या मुलाचा दात दुखत असल्याने २७ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास त्या पती सासूसोबत मुलाला घेऊन साई दातांचा दवाखाना येथे गेल्या. मुलाचा दात तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या. त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता स्वतः डॉ. राहुल बिराजदार यांनी कॉल केला. उद्या तुम्ही मुलाला दातांच्या तपासणीसाठी घेऊन या आपण सर्व करून घेऊ असे सांगितले.
त्यानुसार २८ ऑक्टोबरला रात्री साडेसातच्या सुमारास महिला तिची सासू मुलाला घेऊन दवाखान्यात गेले. त्यांचे पती थोड्यावेळात आले. डॉक्टरांनी मुलाची तपासणी केली. त्याचे चार दात किडलेले होते. त्यातील तीन दाताला सिमेंट भरले व एका दाताला छिद्र पाडले. घरी गेल्यानंतर मुलाला रात्री खूप ताप आल्याने सलग तीन दिवस दाताच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले नाही. १ नोव्हेंबरला पावणे आठच्या सुमारास डॉ. राहुल बिराजदार यांनी कॉल करून मुलाला रूट कॅनालसाठी घेऊन येण्यास सांगितले.
दोघे दाम्पत्य मुलाला घेऊन बिराजदार यांच्या दवाखान्यात गेले. मात्र मुलगा डॉक्टरांकडे थांबत नसल्याने डॉक्टरांनी दाम्पत्याला बाहेर जाण्यास सांगितले. बऱ्याच वेळानंतर दाम्पत्य मुलाकडे गेले तेव्हा तो जोरजोरात रडत होता. आईला पाहताच त्याने आईकडे धावला. त्याला जवळ घेतले तेव्हा त्याच्या गालावर मारल्याचे निशाण दिसून आले. तो घाबरलेल्या अवस्थेत रडत असल्याने त्याला दाम्पत्य घरी घेऊन गेले. रात्री डॉक्टरला फोन करून मारहाणीचा जाब विचारल्यानंतर त्याने सरळ मारले नसल्याचे सांगितले. तेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे दाम्पत्याने ठरविले.
सीसीटीव्हीत मारहाणीची घटना कैद
फिर्यादीनुसार, ३ नोव्हेंबरला रात्री दाम्पत्य सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी साई दातांचा दवाखान्यात गेले. सीसीटीव्ही फुटेज ओपन होत नसल्याने त्यांनी स्वतः डीव्हीआर घेऊन तुम्ही दुरुस्त करून चेक करून बघा असे बोलले. त्यामुळे दाम्पत्य डीव्हीआर घेऊन गेले. त्यांनी तपासणी केली तेव्हा १ नोव्हेंबरच्या फुटेजमध्ये डॉक्टर आणि कंपाउंडर मुलासोबत अमानुष कृत्य, अत्याचार करताना दिसून आले. डॉक्टरला जाब विचारला तेव्हा ट्रीटमेंटचा भाग असल्याचे सांगून शिवीगाळ करून दाम्पत्यालाच धमकावले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार मी २१ वर्षांपासून प्रॅक्टिस करतो. कधीही हलगर्जीपणा केलेला नाही. कोणीही आजपर्यंत माझ्याविरुद्ध एकही तक्रार केलेली नाही. मुलाच्या कुटुंबीयांकडून मला ब्लॅकमेल केले जात आहे. या संदर्भात मी उस्मानपुरा पोलिस ठाणे तसेच पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.डॉ. राहुल बिराजदार