

BJP office inaugurated today by Chief Minister
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चिकलठाणा येथे भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ आणि हरित क्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण व कमल तलावाचे लोकर्पण देखील होणार आहे.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती राहणार आहे.
सकाळी ११ वाजता कार्यालयाचे उद्घाटनानंतर १ वाजता सिडको चौकात उभारण्यात आलेल्या हरित क्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यानंतर क्रांतीचौक येथे महापालिकेने उभारलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
या कार्यक्रमानंतर आमखास मैदान येथील कमल तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे लोकर्पण होणार आहे. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ४.३५ वाजता चिकलठाणा विमानतळाहून मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबईला परतणार आहेत.