Sambhajinagar District Council and Panchayat Samiti elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या चारही जि.प., पं.स.मध्ये शेकडो उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यानंतर या चारही ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
जि.प., पं.स. निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) व भाजपने युती करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तसेच उबाठा, काँग्रेसचाही आघाडीसाठी प्रयत्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. शेवटच्या क्षणापर्यंत युती आणि आघाडीसाठी भरपूर प्रयत्न झाले. मात्र छत्रपती संभाजीनगरसह चारही ठिकाणी युती आणि आघाडीत फूट पडली.
संभाजीनगरमध्ये युती घोषित केल्यानंतर भाजपचा वाट्याला आलेल्या जागांवर शिवसेनेने तर सेनेच्या जागेवर भाजपाने उमेदवार दिले होते. शेवटच्या दिवशी एकमेकांच्या विरोधात दिलेले उमेदवार अर्ज मागे घेतील असे सांगण्यात येत होते. मात्र तसे घडले नाही. संभाजीनगरात सेनेच्या युतीत २५ जागा आल्या होत्या. प्रत्यक्षात सेनेने ४८ जागांवर उमेदवार दिल. भाजपच्या वाटेला आलेल्या २७जागांसह अन्य ११ जागांवरही भाजपने उमेदवारांना एबी फॉर्म दिले. अशीच परिस्थिती मराठवाड्यातील अन्य जिल्हा परिषदेमध्ये घडली.