Sambhajinagar Datta Jayanti Devotees Crowd
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दत्त जयंतीनिमित्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषांनी गुरुवारी (दि.४) एकीकडे शहर दणाणून गेले असताना दुसरीकडे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग (दिडोरी प्रणित) यांच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने हा धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आदे-शाने जिल्ह्यातील तब्बल १२४ स्वामी समर्थ केंद्रांवर भव्य अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात लाखो सेवेकऱ्यांनी भक्तिभावाने सहभाग नोंदवत दत्तभक्तीची प्रचिती घडवली.
नामजप सप्ताह काळात सर्व केंद्रांवर जवळपास ६४,००० गुरुचरित्र अध्यायांचे सामुदायिक वाचन करण्यात आले. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेदरम्यान महिला सेवेकऱ्यांची आणि रात्री ७ ते सकाळी ७ वाजेदरम्यान पुरुष सेवेकऱ्यांची प्रहारसेवा मोठ्या संख्येने पार पडली. दरम्यान, सर्व केंद्रांची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. दुपारी १२.३९ वाजता गुरुचरित्रातील चार अध्यायांचे वाचन करून जन्मोत्सव साजरा झाला.
यावेळी केंद्रांवर सेवेकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय अधिकारी यांनीही उपस्थित राहून सहभाग नोंदविला. या सप्ताहाचा समारोप ५ डिसेंबरला सत्यदत्त पूजन आणि महाप्रसादाने करण्यात येणार आहे. या काळात सर्व केंद्रांवर स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती जप आदींचे सामुदायिक पठण करून राष्ट्रहितासाठी प्रार्थना करण्यात आल्या.
सिडकोत रामदासी यांचे कीर्तन
सिडको एन-सातमधील जागृत्त दत्त मंदिरात सायंकाळी जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रज्ञा रामदासी यांचे कीर्तन झाले. गेल्या आठवडाभरापासून जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम सुरू असून, उत्सवाची सांगता शनिवारी (दि.६) महाप्रसादाने होणार आहे.
जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंदिराचा परिसर फुलांनी, रो-षणाईने सजविण्यात आला होता. ५६ भोगचा नैवेद्य दत्तात्रेयाला दाखविण्यात आला. दत्ताची मूर्तीला पाळण्यात ठेवून मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख सोहळा पार पडला. रात्री परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.