

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: लाखो रुपयांचे शुल्क भरूनही संस्थेने एमसीएच्या परीक्षेचे हॉलतिकीट दिले नाही. परिणामी गुरुवारी (दि.४) सकाळी सुरू झालेल्या एमसीए प्रथम वर्षाच्या परीक्षेला सुमारे १३३ विद्यार्थ्यांना मुकावे लागले. संतप्त विद्यार्थ्यांनी श्री साई इन्स्टिट्यूटविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून जे. के. जाधव, संचालकासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, इन्स्टिट्यूटच्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
श्री साई इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च या संस्थेचे कॉलेज सिडको आंबेडकरनगर-मिसारवाडी भागात आहे. या संस्थेत प्रवेश घेतलेल्या जवळपास १३३ विद्यार्थ्यांनी लाखो रुपये शुल्क भरले. गुरुवारी सकाळी १० वाजता एमसीए प्रथम वर्षाची परीक्षा होती. त्यासाठी कालपासूनच विद्यार्थी हॉलतिकीटसाठी संस्थेच्या कार्यालयात ठाण मांडून होते. मात्र विद्यापीठाने परीक्षेचे हॉलतिकीट दिलेच नाही. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले.
सकाळी ७ वाजेपासूनच शेकडो विद्यार्थी संस्थेच्या कार्यालयासमोर जमले होते. मात्र संस्थाचालक आणि शिक्षक कार्यालयाला कुलूप लावून गायब झाले. विद्यार्थ्यांसह पालकांनी संस्थेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
विद्यापीठाकडे बोट
माहितीनुसार, विद्यापीठ आणी सदर संस्थेच्या वादाचे प्रकरण कोर्टात आहे. रात्री उशिरा काही विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले, तर सुमारे १३३ विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळालेच नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. संस्थेने मात्र विद्यापीठाकडे बोट दाखवत हात वर केले. संस्था आणि विद्यापीठ यांच्या वादात शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
संलग्नीकरण नाही
याबाबत विद्यापीठाच्या वतीने या संस्थेचे संलग्रीकरण नाही. संबंधित संस्थेने विद्यापीठाच्या अटी पूर्ण करून संलग्नीकरण करून घ्यावे. त्यानंतरच त्या विद्याथ्यांचे प्रवेश आणि त्यांचे शुल्क व इतर प्रक्रिया पार पडणार आहे
विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थ्यांची पोलिस ठाण्यात धाव
परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी संस्थेच्या कार्यालयावर गेले, मात्र तिथे कुलूप पाहून विद्यार्थ्यांसह पालकही संतप्त झाले. त्यांनी थेट सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत संस्थेविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी साक्षी शेलार या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून जे. के. जाधवसह संचालक विक्रांत जाधव, शिक्षक संघपाल कांबळे, लक्ष्मण गायकवाड व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली