

Shivai provides services to passengers from Samruddhi Highway
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : येथील मुख्य वसस्थानकातून नाशिक मार्गावर धावणारी सकाळच्या सत्रातील एक शिवाई बस समृध्दी महामार्गावरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गुरुवारपासून (दि.४) यावर अंमल करण्यात आला आहे. प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी हा प्रयत्न असून, ३ तासांत नाशिक गाठण्याचा प्रयत्न एसटीकडून करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख अजय पाटील यांनी दिली.
नुकतीच नाशिक मार्गावर शिवाई ई-बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसात मिळत आहे. ही बस वैजापूर, येवला मार्गावरून धावत आहे. या गाडीला नाशिकला जाण्यासाठी ४ ते ५ तासाचा वेळ लागतो. दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते डायरेक्ट नाशिक प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. त्यांच्या सुविधेसाठी सकाळच्या सत्रातील शिवाई समृध्दी महामार्गावरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या प्रवाशांना केवळ तीन तासांत नाशिक गाठता येणार आहे.
असे राहणार तिकीट
समृद्धीमार्गे धावणाऱ्या ई-बसला ५०९ रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या वैजापूर येवलामार्गे धावणाऱ्या ई-बससाठी ५४०, तर शिवशाही साठी ५१० रुपये तिकीट आकारण्यात येत आहे. आता लवकर आणि कमी पैशात नाशिक गाठता येणार असल्याने याला किती प्रतिसात मिळणार हे येणाऱ्या दिवसांत समोर येणार आहे.