ANM-GNM admission process : एनएम-जीएनएम प्रवेशप्रक्रिया 'जैसे थे' file photo
छत्रपती संभाजीनगर

ANM-GNM admission process : एनएम-जीएनएम प्रवेशप्रक्रिया 'जैसे थे'

३० सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रवेश नाही; प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संरक्षण

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar ANM-GNM admission process

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृतसेवा : एएनएम आणि जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तूर्त विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कोणतेही अंतिम प्रवेश होणार नाहीत, तसेच संबंधित महाविद्यालयांनी आधीच प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना संरक्षण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल एज्युकेशन बोर्डाच्या एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांसाठी २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. या अधिसूचनेला प्रायव्हेट नर्सिंग स्कूल अँड कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशनने आव्हान दिले होते.

आधीच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी वर्गांना उपस्थित राहत असताना त्यांना पुन्हा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून (सीएपी) प्रवेश घ्यावा लागणार असल्याचा दावा असोसिएशनने केला. या अर्जावर न्या. किशोर सी. संत आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता. २३) सुनावणी झाली. प्रतिवादींकडून सध्या केवळ ऑनलाइन नोंदणी सुरू असून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया २९ सप्टेंबरनंतर सुरू होईल, असा युक्तिवाद करण्यात आला.

न्यायालयाने प्रकरणाची तातडीने ३० सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली. तसेच २१ सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार झालेली पुढील कार्यवाही याचिकेतील अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. व्ही.डी. होन, अॅड. ए.व्ही. होन यांनी तर प्रतिवादींच्या वतीने अॅड. एम. डी. नरवाडकर आणि अॅड. एस. व्ही. दीक्षित यांनी काम बघितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT