Container car collision Ajanta PUDHARI
छत्रपती संभाजीनगर

Ajanta Ghat Accident | अजिंठा घाटात कंटेनरची कारला धडक : प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत दरख बालंबाल बचावले

सुदैवाने या अपघातात डॉ. प्रशांत दरख, त्यांचे मोठे बंधू, नातेवाईक व वाहनचालक असे चौघेजण थोडक्यात बचावले

पुढारी वृत्तसेवा

Container car collision Ajanta

अजिंठा : छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध युरोलॉजिस्ट (मूत्ररोग तज्ञ) अँड्रोलॉजिस्ट व ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. प्रशांत दरख हे जळगावकडे खासगी कामानिमित्त कारने ( एम एच २० एफ वाय ९२३९) जात असताना अजिंठा घाटात शनिवारी (दि.०९ ) सकाळी ११:३० ते १२ च्या दरम्यान भीषण अपघात झाला.

सुदैवाने या अपघातात डॉ. प्रशांत दरख, त्यांचे मोठे बंधू, नातेवाईक व वाहनचालक असे चौघेजण थोडक्यात बचावले. हा अपघात घाटातील दर्ग्याजवळ, शुक्रवारी दुपारी झालेल्या बस-ट्रक अपघाताच्या ठिकाणाजवळच घडल्याने पुन्हा एकदा घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातामुळे घाटात एक ते दीड तास वाहतुकीची कोंडी झाली होती.

डॉ. दरख व त्यांच्या वाहनचालकाने दिलेल्या माहितीनुसार, घाटातील अवघड वळणावर एक आयशर वाहन (एम पी ४१ जी ए ०७२१ ) सकाळपासून बंद अवस्थेत उभे होते. त्या वाहनाला ओव्हरटेक करत एक टेम्पो ( एम एच २८ एच ६४१० ) पुढे येत असताना डॉ. दरख यांची कार थांबली होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार अक्षरशः आडवी होत दरीच्या कडेला जाऊन थांबली. दैव बलवत्तर म्हणून वाहन दरीत कोसळले नाही आणि मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, कंटेनरने टेम्पोलाही धडक दिली. मात्र, टेम्पो चालक व क्लिनरलाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर काही काळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, हेड कॉन्स्टेबल राम आडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवून एका बाजूने वाहतूक बंद ठेवत दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

अपघातानंतर डॉ. प्रशांत दरख हे एका खासगी वाहनाने जळगावकडे रवाना झाले. विशेष म्हणजे, शुक्रवारी दुपारी याच घाटात एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातातही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती; मात्र रात्री उशिरापर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

अजिंठा घाटात वारंवार होणारे अपघात व वाहतूक कोंडी यामुळे जग प्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे देश विदेशातील पर्यटक, प्रवासी, लग्न वऱ्हाडी तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. घाटातील धोकादायक वळणे, बंद पडलेली वाहने आणि वाढती वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

ज्या ठिकाणी आमची गाडी थांबली, त्या ठिकाणापासून काही फुटांवरच खोल दरी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडलो.
- डॉ. प्रशांत दरख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT