छत्रपती संभाजीनगर : वीजमीटरच्या सर्व्हिस वायरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा ठपका ठेवत, ६० ते ७० हजार रुपयांचा दंड आणि कारवाईची भीती महावितरणच्या दाखवून अधिकाऱ्यांच्या नावाने २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका खासगी दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. २६) शिवाजीनगर भागात करण्यात आली. विष्णू सिताराम खरात (५०, रा. मिसारवाडी, गल्ली नं. ७) असे आरोपीचे नाव आहे.
शिवाजीनगर भागातील रहिवासी असलेल्या एका ४२ वर्षीय गृहिणीच्या घरी शुक्रवारी (दि. २३) महावितरणच्या पथकाने अचानक मीटरची तपासणी केली होती. मीटरमध्ये बायपास करून वायरमध्ये छेडछाड केली आहे, त्यामुळे तुमच्यावर थेट वीजचोरीची फौजदारी कारवाई होईल आणि ६० ते ७० हजार रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल, अशी भीती तपासणी पथकाने या महिलेला घातली होती. त्यानंतर परिसरातील खाजगी इसम विष्णू खरात याने तक्रारदार महिलेशी संपर्क साधला.
महावितरणच्या साहेबांना ३० हजार रुपये द्यावे लागतील, तसे केले तर कोणतीही कारवाई होणार नाही आणि दंडही भरावा लागणार नाही, असे आमिष दाखवून त्याने लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्या गृहिणीने थेट एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने पडताळणी केली असता, खरात याने तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सोमवारी पथकाने तक्रारदार महिलेच्या घरीच सापळा रचला.
काही अधिकारी तक्रारदार गृहिणीच्या घरातच एका खोलीत दबा धरून लपले, तर काही अधिकारी घराबाहेर साध्या वेशात पाळत ठेवून थांबले. आरोपीने घरात येऊन लाचेची रक्कम स्वीकारताच तुम्ही तातडीने घराच्या अंगणात यायचे आणि ठरलेला इशारा करायचा, असे नियोजन एसीबीने आधीच आखून दिले होते. ठरल्याप्रमाणे विष्णू खरात हा पैशांची वसुली करण्यासाठी महिलेच्या घरात आला. महिलेकडून २५ हजार रुपयांची रोकड घेऊन त्याने ती स्वतःच्या खिशात टाकली.
रक्कम खिशात पडताच महिलेने अंगणात येऊन पथकाला पूर्वनियोजित इशारा केला. अधिकाऱ्यांनी या खाजगी दलालाला जागीच रंगेहाथ पकडले आणि त्याच्या खिशातून लाचेची रक्कम जप्त केली. खाजगी दलाल विष्णू खरात याला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. मीटर तपासणी करणाऱ्या महावितरणच्या पथकातील कोणत्य अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्य सांगण्यावरून खरात ही लाचेची रक्काम गोळा करत होता, याचा शोध घेतल जात आहे.
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यार्च प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ह कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर अधीक्षक शशीकांत सिंगारे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण आणि त्यांच्य पथकातील अंमलदारांनी केली.
दलालाच्या खिशातून रक्कम जप्त
वीजचोरीचा ठपका ठेवून ६० ते ७० हजारांच्या दंडाची भीती.
महावितरणच्या साहेबांच्या नावे ३० हजारांची लाच मागितली.
तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना दलालाला अटक.
गृहिणीने एसीबीकडे केली होती तक्रार.
दलालाच्या खिशातून लाचेची रक्कम जप्त.
महावितरणच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा शोध सुरू.