Sambhaji Nagar residents spend Rs 70 crore on tobacco every month
छत्रपती संभाजीनगर :
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होऊ शकतो हे माहिती असूनही या व्यसनावर अनावश्यक खर्च करणाऱ्यांची संख्या कमी नाही. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तंबाखूवर दर महिन्याला तब्बल ६० कोटींहून अधिकची रक्कम उडविली जाते. यात ४० कोटी सिगारेटच्या झुरक्यावर, तर ३० कोटी तंबाखू, खैनी चघळण्यासाठीच्या व्यसनापोटी खर्च होत असल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले.
३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखणे हा यामागील उद्देश आहे.
देशात दरवर्षी तंबाखू व तंबाखूजन्य सेवनामुळे सुमारे ८ ते ९ लाख लोकांचा मृत्यू होतो. दिवसेंदिवस तरुणाई व्यसनाच्या अधीन होत आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा सारख्या व्यसनांच्या विळख्यात तरुणाई सापडली आहे. सुरुवातीला सहज फॅशन म्हणून घेतलेला झुरका आणि खालेली पुडी पुढे कायमची सवय बनते. झोपडपट्या, उच्चभू वसाहती, इतकेच नव्हे तर महाविद्यालयीन आणि अनेक शालेय विद्यार्थीही व्यसनामध्ये गुरफटू लागले आहेत. कधी मित्रांच्या आग्रहापोटी, तर काही वेळा मौजमज्जा म्हणून तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेटची सवय लागते. त्यासाठी मग दररोज पन्नास ते शंभर रुपयांचा अनावश्यक खर्च सुरू होतो. संभाजीनगर शहरात तंबाखूवर महिन्याला सुमारे १० कोटी, तर बिडी-सिगारेटच्या नशावर ३० कोटी उडवले जातात. ग्रामीण भागात हेच प्रमाण उलट असून, तंबाखूवर २० कोटी आणि एक झुरक्यासाठी १० कोटीचा धुआ केला जातो, असेही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी सांगितले.
योगेश सोळुंके, समुपदेशक,66 तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनासाठी लाखोंचा अनावश्यक खर्च होतो, त्यापेक्षा जास्त खर्च या व्यसनामुळे झालेल्या कर्करोगावर होतो. कायद्याने १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. तरीही अनेक मुले व्यसनाधिन आढळतात. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांअतर्गत कारवाईसोबतच तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन सोडण्यासाठी समुपदेशन केले जाते.
-डॉ. अजय बोराळकर, राज्य कर्करोग संस्था66 तंबाखूमधील ७० ते १५० घटकांमुळे कॅन्सर होऊ शकतो. यातील निकोटीनमुळे व्यक्तीला सवय लागते. मुख, अन्ननलिका, मूत्राशय, स्वादुपिंडसह ४० टक्के कर्करोग तंबाखूमुळे होतो. हेल्पलाईन, समुपदेश केंद्रात जाऊन लोकांनी व्यसन सोडावे आणि आपले आरोग्य जपावे.
-डॉ. मेराज कादरी, मानसोपचार तज्ज्ञ.66 तंबाखू खाने किंवा बिडी, सिगारेट ओढणे हे मानसिक आजार आहे. मौजमज्जा म्हणून केलेले व्यसन पुढे सवय बनते. हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंब आणि समाजासाठी घातक असते. त्यामुळे पहिल्यांदाच व्यसनाना नाही म्हणा, पालकांनीही मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, ते मोबाईलवर काय बघतात, त्यांचे मित्र कोण आहेत. याची माहिती घेत राहावी.