छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : मराठवाड्यात तीन वर्षांत ६३४ जणांना मिळाली 'दृष्टी'

आज जागतिक दृष्टीदान दिन : नेत्रदानातून अनेकांच्या अंधकारमय जीवनात उजेड

पुढारी वृत्तसेवा

Sambhaji Nagar News: 634 people got 'vision' in three years in Marathwada

राहल जांगड़े

छत्रपती संभाजीनगर :

मरावे परी नेत्ररूपी उरावे, या उक्तीप्रमाणे मरणोत्तर नेत्रदानाने मराठवाड्यातील ६३४ अंधांना नवी दृष्टी मिळाली आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार मागील तीन वर्षात छत्रपती संभाजीनगर विभागातील चार जिल्ह्यांत ८०० जणांच्या नेत्रदानातून ५७६ दृष्टिहीन व्यक्तींच्या जीवनात उजेड परतला आहे. तर लातूर विभागातील चार जिल्ह्यांत २२८ नेत्र संकलनातून ५८ अंध व्यक्तींना डोळे मिळाली आहेत.

दृष्टीमुळे या सर्वांना सृष्टीचे सौंदर्य अनुभवता येत आहे. दरवर्षी १० जून रोजी जागतिक दृष्टीदान दिन हा सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली सवाँत मोठी देणगी आहे. परंतु काही व्यक्ती जन्मतः अंध असतात तर, काहींना जन्मानंतर अंधत्व येते. त्यामुळे अशा व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचे सौंदर्य पाहू शकतात.

माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तींनी दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान करावे, यासाठी जनजागृती केली जाते. शासनाकडून विविध योजना आणि नेत्रपेढ्या, फिरती नेत्रपथके कार्यरत आहेत. मरणोत्तर तसेच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संभाजीनगर विभागात २०२२-२३मध्ये २७३ नेत्रसंकलनातून १९८ जणांना दृष्टी मिळाली. २०२३-२४ मध्ये २४५ नेत्रदानातून १६२ जणांना, तर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत २८२ नेत्रदानातून २१६ दृष्टिहीनांना नवे डोळे मिळाले आहेत.

लातूर विभागात २०२२-२३ मध्ये ८० नेत्रदानातून १९ जणांना, तर २०२३-२४मध्ये ६६ नेत्रसंकलनातून १४ नेत्रप्रत्यारोपण आणि १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत २८२ नेत्रदानातून २१६ अंधांना नवे डोळे मिळाले आहेत.

नेत्रदानासाठी सर्वांनी पुढे यावे

एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानाने दोघांना दृष्टी मिळते, मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डोळे (बुबुळ) काढून नेत्ररोपण केले जाते. A काही रसायनांच्या माध्यमातून बुबूळ १४ दिवसांपर्यंत जतन करणे शक्य झाले आहे. एड्स, कावीळ तसेच संसर्गजन्य आजार नसलेले २ वर्षांवरील सर्व व्यक्ती नेत्रदान करू शकतात. त्यामुळे नेत्रदानासाठी सर्वांनी पुढे यावे.
डॉ. अर्चना वरे-पाटील, नेत्र विभागप्रमुख, घाटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT