Sale of food grains through open auction
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत सात ऑगस्टपासून भुसार धान्याची विक्री आता ओपन लिलाव पध्दतीतून होणार आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी मंडळाच्या नियमन उपसमितीची सभा बुधवारी (दि. २९) बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
सभापती राजू नाना भुमरे म्हणाले की, ओपन भुसार मार्केट लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक वातावरणात त्यांच्या शेतमालाला अधिकचा व योग्य भाव मिळणार आहे. व्यापाऱ्यांना दर्जेदार व मोठ्या प्रमाणात शेतमाल उपलब्ध होईल. त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढेल, व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि बाजार समितीवर शेतकरी व व्यापाऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हितासाठी भविष्यातही असेचनावीन्यपूर्ण निर्णय घेत राहील. नव्या व्यवस्थेमुळे व्यवहारात संपूर्ण पारदर्शकता येणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अधिक स्पर्धात्मक भाव मिळणार आहे. तसेच यापूर्वी आडतदारातून खरेदीदार करता आकारली जाणारी तीन टक्के अडत देण्याची आवश्यकता राहणार नसल्याने त्या खर्चाची बचत होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतमाल भाव वाढ होण्यास मदत होईल, तर व्यापाऱ्यांनाही अधिक प्रमाणात शेतमाल उपलब्ध होईल. याचा शुभारंभ ७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली.
बैठकीला उपसभापती राम पाटील एरंडे, संचालक बद्री पाटील बॉबले संभाजी पवार, सचिन मोगल, महेश मुंदडा, मुकेश काला, राजू टेकाळे, बाजार समितीचे सचिव नितीन विखे व अधिकारी, पदाधिकारी तसेच भुसार (धान्य) मालाचे सर्व आडतदार व खरीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपसभापती राम पाटील एरंडे यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, ओपन लिलाव पद्धतीचा जास्तीत जास्त लाभघ्यावा. या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना अधिक स्पर्धात्मक भाव, पारदर्शक व्यवहार आणि त्यांच्या कष्टाच्या मालाचे योग्य मूल्य मिळणार असून, बाजार समितीतील शेतमालाची आवकही वाढणार आहे.
असे असेल नियोजन...
व्यवस्थेनुसार शेतकरी सकाळी ११.०० वाजता आपला भुसार माल थेट बाजार समितीच्या यार्डात वाहनासह आणतील. माल वाहनामध्येच ठेवण्यात येईल आणि सर्व व्यापारी त्या वाहनाजवळ उभे राहून खुल्या व स्पर्धात्मक लिलाव पद्धतीने बोली लावतील. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्यास माल विक्री करण्यात येईल.