Salary of municipal workers increased by ten thousand rupees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने कंत्राटदार एजन्सी बदलताच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा दिवाळीपूर्वीच भरघोस वाढ करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना एजन्सीकडून किमान वेतन देण्याचे आदेश दिल्यानंतर ही वाढ लागू झाली, त्यामुळे वाहनचालक व मजुरांच्या पगारात सुमारे दहा हजार रुपयांनी वाढ झाली असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अधिक गोड झाली आहे. या पार्श्वभूमीवर यांत्रिकी विभागाच्या वतीने शनिवारी (दि.१८) जकात नाका येथील वर्कशॉपमध्ये आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वाढीव वेतनाची अपेक्षा होती. आयुक्तांनी दिलेल्या आदे शानुसार आता एजन्सींना कर्मचाऱ्यांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन देणे बंधनकारक ठरले आहे. त्यामुळे कंत्राटी वाहनचालकांचा पगार १५ हजारांवरून २१,२०० रुपये, तर मजुरांचा पगार १३ हजारांवरून १९,६०० रुपये इतका वाढला आहे. एवढेच नव्हे तर मागील दोन महिन्यांचा पगारही एकत्र देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे पगारात भरघोस वाढ झाल्याने कर्मचार्यांच्यावतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी फुलांची उधळण व टाळ्यांच्या गजरात आयुक्तांचे स्वागत करून मोठ्या उत्साहात सत्कार सो-हळा पार पडला. या कार्यक्रमाला यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, उपअभियंता सचिन वाईकर, कनिष्ठ अभियंते वैभव बोरकर, प्रेषित वाघमारे, राधिका चव्हाण, प्रफुल्ल राठोड, शुभम भुमरे, तसेच कंत्राटी कर्मचारी सुभाष काने, जयेश नरवडे, नरेश इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी आयुक्तांचे मनःपूर्वक आभार मानत, यंदा खरी दिवाळी झाली, अशी भावना व्यक्त केली.
आयुक्तांची पाहणी आणि नवे प्रकल्प
सत्कारानंतर आयुक्तांनी यांत्रिकी विभागाच्या परिसराची पाहणी केली. या भागातील मोकळ्या जागेत महापालिकेच्या इतर विभागांच्या इमारती स्थलांतरित करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची पाहणी करून त्यांच्या आवश्यक सोयीसुविधांबाबत चर्चा करण्यात आली. यांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज आयुक्तांच्या निर्णयामुळे शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून पगारवाढीची मागणी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिवाळीपूर्वीचा मोठा दिलासा ठरला आहे. यांत्रिकी विभागाच्या परिसरात या आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलेले आदेश केवळ आर्थिकच नाही, तर नैतिक बळ देणारे आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.- अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग.